दोंडाईचा | समाधान ठाकरे
येत्या मंगळवार (दि. २१) तारखेपासून श्रावण महिना सुरु होत असल्याने पुढील काही दिवस अनेकांनकडे मांसाहार वर्ज्य असणार आहे. म्हणून मांसाहारींनी आज (रविवारी) चिकन-मटन आणि माशांवर यथेच्छ ताव मारल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनमुळे महिनाभर कसाबसा शाकाहार गळी उतरवलेल्या मांसाहारींनी आज भल्या सकाळीच दुकान गाठत महागडे मांस, मासे खरेदी करत रविवार सत्कारणी लावला आहे. खवय्यांचा भारी उत्साह चिकन, मटण विक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेर दिसून आला. तसेच गावाबाहेरील मांसाहारी हॉटेलांवर खवय्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.
श्रावण महिण्यात काहींच्या घरी जबरदस्तीने शाकाहार खायला भाग पाडले जाते. अशा अघोषित बंदीच्या एक दिवस आधी रविवारचा योग जुळून आल्याने अनेकांनी घरी मांसाहारचे बेत आखलेले होते.
येत्या रविवारी मटण, चिकन व मासळीला खवय्यांकडून मोठी मागणी असणार याचा विक्रेत्यांनी आधीच अंदाज बांधत भाव देखील वाढवले होते. त्यानुसार रविवारसाठी जादा मालाची आवक करण्यात आली होती.
शहरात काल पासून स्वयंपुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे अशात मांसाहार खवय्यांची उसळली गर्दी पाहून शहरातील सुज्ञ नागरिकांनाकडून सोशल मीडियावरून प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. करोना सारख्या भयंकर महामारीत जीवा पेक्षा जीभचे चोचले महत्त्वाचे आहे का ?, असा सवाल यावेळी उपस्थीत करण्यात येत आहे.
तसेच जनता कर्फ्यू मध्ये मांसाहार विक्री करण्याची मौखिक परवानगी नगरपालिकेनेच दिली आहे. असे देखील काहींचे म्हणणे आहे.