पुणे (प्रतिनिधी) – सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपास करत आहेत. मात्र, काहींनी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी नि:पक्षपणे चौकशी व्हावी, त्यामध्ये कोणतंही राजकारण येऊ नये असे मला वाटतंय असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, अनेक नावे घेतली जात आहे पण ते सोशल मीडियावर. यावर किती विश्वास ठेवायचं हा एक प्रश्नच आहे. यावर आत्ता अनेक मोठं मोठे लोक बोलायला लागले आहे. त्यातून बिहार महाराष्ट्र अशी चर्चा होत आहे. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या मदतीनेही आपण सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी चालू ठेवू शकतो. जर सुशांतसिंगवर अन्याय झाला असेल आणि कोणी बाहेरचा व्यक्तीने हे केलं असेल तर लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि जबाबदार व्यक्तीला शिक्षा व्हावी असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले.
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्या मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र काहींनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे.