मोबाईलचा अतिरेकी वापर ही मोठीच समस्या बनली आहे. समाजतज्ञही या समस्येकडे वारंवार लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. या मुद्याला धरुन वेगवेगळी सर्वेक्षणे जगभर होत आहेत. त्यांचेही निष्कर्ष काहीसे नकारात्मकच आढळतात. अशाच एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार मोबाईलच्या वापरात भारत जगात तिसर्या क्रमांकावर आहे. भारतीय लोक रोज साधारणत: चार तास मोबाईल वापरण्यात व्यतित करतात असाही निष्कर्ष त्यात नमूद असल्याचे माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. मोबाईल वापराचे मुलांवर होणारे दुष्परिणाम हा जागतिक अभ्यासाचा विषय आहे. 18 वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरापासून दूर ठेवण्याचा निर्णय बांशी ग्रामपंचायतीने घेतला आहे. बांशी हे यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील एक गाव. या गावाने 18 वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे. पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देऊ नयेत असेही बजावले आहे. ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल वापराचे मुलांवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात हे आता सर्वज्ञात आहे. मानसोपचार तज्ञही त्याकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. तथापि बांशी गावाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळण्यासाठी त्या वस्तूचा वापरच बंद करणे हा त्यावरचा मार्ग व्यवहार्य ठरू शकेल का? युग तंत्रज्ञानाचे आहे. युवा पिढी तंत्रज्ञानाचा रोज नवनवा आविष्कार घडवत आहे. युवापिढीमधील संशोधक वृत्तीला खतपाणी घालणार्या हॅकेथॉन्स सारख्या वेगवेगळ्या स्पर्धा जगभर घेतल्या जातात. त्यातूनच तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर करण्याकडे युवापिढीचा कल वाढत आहे. सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तरुणाई करत आहे. अशा पद्धतीच्या स्टार्टअपला सरकारी पातळीवर सुद्धा पाठबळ दिले जात आहे. करोना काळापासून ऑनलाईन शिक्षणपद्धती सामाजिक पातळीवर काही प्रमाणात स्वीकारली गेली आहे. तात्पर्य, कोणत्याही वयोगटातील पिढीचा मोबाईल वापर शंभर टक्के थांबवणे व्यवहार्य ठरु शकेल का? असे करुन आपण विशिष्ट वयोगटातील मुलांना विज्ञान विन्मूख बनवतो आहोत का? त्याऐवजी मुलांना मोबाईलचा आणि तंत्रज्ञानाचा विवेकी वापर शिकवायला हवा. त्याचे अनेक मार्ग तज्ञ सुचवतात. मुलांना खेळायला घेऊन जाणे, निसर्ग सहवास वाढवणे, नवनवे प्रयोग करुन पाहायला उद्युक्त करणे, बागकाम करणे, माणसांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधणे, छोटेछोटे छंद जोपासणे हे त्यापैकीचे काही मार्ग. अर्थात असे मार्ग अंमलात आणण्यासाठी पालकांचाही सक्रीय सहभाग आवश्यक आहे हे विसरुन चालणार नाही. अन्यथा मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि मोबाईलचा तासनतास वापर करणारे पालक हे अनेक घरांमधील रोजचे चित्र आहे. तेव्हा, बंदीचा कोणताही निर्णय घेताना तो व्यवहार्य ठरायला हवा. वापर बंद व्हावा याऐवजी तो योग्य रीतीने व्हावा हे निर्णयाचे उद्दिष्ट असावे. कारण केवळ मोबाईलचा वापरच नव्हे तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच याचा विसर पडून कसा चालेल? तेव्हा, अतिरेकाला पायबंद घालणारी नियमावली तयार व्हायला हवी. बांशी गावाने वापर थांबवला. सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव गावात रोज सायंकाळी सात ते साडेआड गावात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर बंदी आहे. मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी पालक मानसतज्ञांचा सल्ला घेऊ लागले आहेत. मोबाईलच्या दुष्परिणामांची जाणीव झाल्याने माणसे सकारात्मक बदलायला तयार आहेत. त्या बदलाला विवेकी दिशा देण्याचे काम जाणत्यांनी करायला हवे.