Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगभाषेची चिंता नको..

भाषेची चिंता नको..

इंग्रजी शाळात मराठी भाषा पंधरवाडा औपचारिक स्वरूपात आदेशाने साजरा होईल.या निमित्ताने मराठी भाषा वाचविण्यासाठी परिसंवाद होतील. भाषा वाचविण्यासाठी चिंता व्यक्त होतील. पण खरच मराठी भाषा मरणांची चिंता व्यक्त होत असली तरी मराठी भाषा मरेल असे काही घडण्याची शक्यता नाही.

जोवर मराठी माध्यमांच्या शाळा आणि मराठी भाषा बोलणारी माणंस आहेत तोवर चिंता कशाला हवी ? मराठी भाषेत जोपर्यंत लोकव्यवहार होता आहेत तोवर भाषेच्या मरणांची चिंता नको. जगभरात इंग्रजी भाषेने इतर भाषा मारण्याचे काम केले आहे हा इतिहास आहे. त्यामुळे त्या इतिहासाने आपण चिंतेत राहाण्याची गरज नाही.भारतात इंग्रजीमुळे स्थानिक भाषा मृत पावल्या आहेत असे काही झाले नाही.जगात मात्र इंग्रजीने अनेक भाषा मारल्या आहेत हे खरे आहे.भाषा जीवंत ठेवयाची असेल तर ती लोकव्यवहाराची भाषा व्हायला हवी. भाषा घराघरात जीवंत ठेवली तरी भाषा जीवंत राहाण्यास मदत होत असते.आपल्या अवतीभोवती असलेली समाज माध्यमांचा स्वभाषेत आपले व्यवहार वाढले आणि भाषेने नव युगाशी जोडून घेतले की चिंता संपुष्टात येण्यास मदतच होणार आहे.

- Advertisement -

भाषा जिवंत ठेवण्यासाठी भाषा हा आत्मसन्मानाचा भाग बनायला हवा असतो.इंग्रजीने अनेक भाषा आपल्या पोटात घेतल्या.आयरिश भाषा पोटात घेण्याचा प्रयत्न होत असतांना आयरिश लोकांनी त्या भाषेचे पुनर्जीवन केल्याचा इतिहास आहे.त्यामागे आयरिश लोकांच्या मनात असलेला राष्ट्रवाद. आयर्लंडने जेव्हा स्वतंत्रपणे आस्तित्वाने मिरवायचे ठरविले तेव्हा आयरिश भाषेला स्वतंत्र स्थान देखील मिळाले.

जगात कोणतीही भाषा मरते तेव्हा त्या समाजाची संस्कृती मरत असते.त्या समूहाच्या मनातील स्वातंत्र्याची प्रेरणा देखील संपुष्टात येते.जगात ज्या ज्या राष्ट्रांनी भाषेचे महत्व जाणले होते त्या त्या राष्ट्रांनी भाषा जीवंत ठेवण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले. भाषा जगविणे म्हणजे राष्ट्र जगविणे असते.जेव्हा जेव्हा भाषा मरते तेव्हा तेव्हा ते राष्ट्र आणि त्यांची एकात्मता संपुष्टात आली आहे.समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम भाषेने केले आहे हे जगाने अनुभवले आहे.

इंग्रजीने ज्या पध्दतीने जगातील अनेक भाषा संपविल्या आहेत त्या प्रमाणे फ्रांन्समध्ये फ्रेंच भाषेने देखील अनेक लहान भाषा संपविल्याचा इतिहास आहे.आपल्या देशात मात्र कोणत्याही राज्यभाषेने त्या राज्यातील स्थानिक भाषा,बोली भाषा संपविण्याचा प्रयत्न केला नाही.आपण महाराष्ट्रात मराठी प्रमाण भाषा मानत असलो तरी महाराष्ट्रात अनेक बोली भाषा आजही जिवंत आहेत. वैदर्भी, ऐरणी, कोकणी, पावरा, गोंड, कोरकू यासारख्या भाषा बोलणारी माणंस आजही आपल्या अवती भोवती आहेत.

त्या भाषेबददल कोणालाही आक्षेप नसतो.अनेकदा या बोली बददल सन्मान वाटत नसला , तरी त्या बोलल्या जातात आणि समाजात त्या स्विकारल्या जातात. त्या बोली बोलतांना लज्जा वाटणार नाही तोवर असे जोवर घडत राहिल तोवर त्याही भाषा संपण्याची शक्यता नाही. या छोटया छोटया भाषा मराठी भाषेच्या सोबतीने वाढत आहेत.त्याच बरोबर मराठी भाषेत देखील अनेक बोली भाषेतील नवनविन शब्द प्रवाहित झाले आहेत.

एकमेकीच्या सहकार्यांने भाषा समृध्द होत राहातात.आजही आपल्या भाषेत अनेक भाषेतील शब्द समाविष्ट झाली आहेत.अगदी इंग्रजी भाषेतील अनेक शब्द मराठीत आली, स्थिरावली आणि बोलण्याच्या प्रवासात प्रवाहित झाली.त्यामुळे मुळ भाषेतील लावण्य कमी होत असले तरी भाषेचे कार्य मात्र साध्य होताना पाहावयास मिळते. परवा परवा आमच्या शहराच्या स्माशानभूमीच्या भिंतीवर “म्युनिसिपल थ्रू सरपण फ्री आहे ” असा फलक लिहिलेला होता.

हे वाक्य वाचतांना ते कोणत्या भाषेतील आहे अशा प्रश्न पडेल , पण त्याचा नेमका काय अर्थ आहे हे शेजारी असलेल्या अल्पशिक्षित वयोवृध्दाला विचारले तरी त्यांनी नेमके पणाने सांगितला.याचा अर्थ अनेक इंग्रजी शब्द मराठीत इतके रूळले आहे , की त्याचा अर्थ शिक्षण नसलेल्या माणसाला देखील त्याचा अर्थ कळतो आहे . अगदी याच वाक्याप्रमाणे आणखी एक संवादात महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या अशिक्षित आईला मोबाईलवरून सांगत होता “आई माझा मोबाईल लाईफ टाईम फ्री आहे ” हे वाक्य इंग्रजी की मराठी असा प्रश्न पडत असला तरी त्या वाक्याचा अर्थ कळतोच.

खरेतर जेव्हा जागतिकीकरण सुरू झाले तेव्हा त्याचा परिणाम भाषांवरती होत राहाणार हे साहजिक आहे.समाजात जेव्हा विविध भाषिक माणसे एकत्रित येतात, तेव्हा भाषेच्या संवादात शब्दांची देवाणघेवाण होत राहाते . त्या सोबत शब्द एकमेकाच्या भाषेत सहजपणे प्रवेशित होतात आणि मग तेच शब्द लोकव्यवहाराच्या भाषेत प्रवाहित राहातात.त्यामुळे भाषा बिघडते असे म्हटले जाते.

खरेतर भाषेत नवनविन शब्दांची भर पडत राहाणे आवश्यक आहेच. नव्याने लागणारे शोध,नवतंत्रज्ञानाची पडणारी भर ,औद्योगिकीकरण,जागतिकीकरण,मुक्त अर्थव्यवस्था,माहिती तंत्रज्ञानाची होणारी क्रांती यामुळे अनेक नव संकल्पना जन्माला आल्या आहेत. त्या संकल्पनाना आपल्या भाषेत पर्यायी शब्द देत राहाण्याचा प्रयत्न भाषा अभ्यासकांनी करायला हवा , पण तो प्रयत्न मात्र मुळ शब्दापेक्षा कठिण असेल असे होता कामा नये.

वर्तमानात इंग्रजी शब्द सुलभ वाटतात. त्यामानाने मराठीने दिलेले पर्यायी शब्द अधिक कठिण वाटत असल्यांने लोक व्यवहारात मराठी भाषा बोलतांना परकीय भाषेचा वापर होणे अपरिहार्य ठरते. अगदी शाळा स्तरावरती विज्ञानासारखा विषय शिकतांना इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी पारिभाषिक शब्द दिले जातात पण ते शब्द विद्यार्थ्यांना निश्चित कठिण वाटतात.त्यात ते शब्द सातत्यांने लोकव्यवहार,शिक्षण प्रक्रियेत उपयोजन केले जात नाही. साधारण लोकव्यवहारात जे सोपे असते ते वापरण्याकडे कल असणे साहजिक आहे.

आपण जेव्हा आपल्या मराठी भाषेचा पंधरवाडा असे म्हणतो, तेव्हा आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगत असलो तरी इतर भाषेत असलेल्या चांगल्या साहित्याची नोंद घ्यायला हवी.केवळ आपल्या भाषेपुरता मर्यादित विचार केला तर स्वभाषा देखील समृध्द होणार नाही.जगातील सर्व भाषांमध्ये विविध प्रकारचे साहित्य आहे. इंग्रजी ही आधुनिक काळात विज्ञानाची भाषा बनली आहे.

जर्मन, ग्रीक, संस्कृत भाषेतील साहित्यात अनमोलत्व सामावलेले आहे. अशा वेळी त्या भाषेतील उत्तम ते इतर भाषांनी स्विकारणे आवश्यक आहे. केवळ पाश्चात्य किंवा परदेशी भाषांचा विचार करण्याबरोबर आपल्या देशात देखील अनेक भाषा आहेत त्या भाषांचा विचार करण्याची गरज आहे. नुकत्याच आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात या संदर्भांने विचार करण्यात आला आहे. एका अर्थांने आपल्या देशात लोकसमूहात शहाणपण आहे. केवळ एकच भाषा बोलणारा समूह येथे फारसा नाही.आजही ग्रामीण भागात देखील मराठी भाषेसोबत हिंदी बोलणारा मोठा समूह आस्तित्वात आहे. त्याच बरोबर आपण ज्या परिसरात,वसाहती मध्ये राहातो.

त्या वसाहतीत असणा-या बहुतांश समुहाची भाषा तेथील उर्वरीत समूह सहजपणे बोलू लागतो.ही भाषिक देवाणघेवाण कितीतरी सहजतेने होत असते.त्यामुळे भाषा विकसित करतांना आपण इतर कोणत्या भाषेचा व्देष करण्याची गरज नाही.अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीतून भाषा विकासाची प्रक्रिया घडत राहाते.त्यामुळे भाषेची चिंता वाहायची असेल तर आपण भाषेतील साहित्य विकसनाकडे,वाचनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

मराठी भाषेतील वर्तमान पत्र,नियतकालिके,अनियतकालिके यांचा प्रसार, लोककला, चित्रपट,नाटय यासारख्या विविध कलांना रसिक मिळाले आणि नवा समाज त्या दिशेने घडविण्याचा प्रयत्न झाला तरी भाषा जिवंत राहाण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्नांना यश मिळेल.गावोगावी किर्तन, तमाशा साऱखे कार्यक्रमाना होणारी गर्दी लक्षात घेतली तरी हे उत्सव मातृभाषेतच चालतात. मराठी साहित्य संमेलनाचा उत्सव हा गेले अनेक वर्ष सातत्याने सुरू आहेत. तेथे होणारी रसिकांची गर्दी, पुस्तक खरेदीत होणारी उलाढाल, त्याच बरोबर राज्यभर विविध ठिकाणी होणारे साहित्य उत्सव त्यात सहभागी होणारे सामान्य रसिकाचा उत्साह भाषा जीवंत राहाण्या संदर्भात आश्वासित करणारा ठरतो.

त्यामुळे मराठी मरेल यांची चिंता करण्यासारखे काही नाही.त्यात सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत असल्यातरी गेले काही वर्षात या माध्यमांच्या शाळामधून विद्यार्थ्यीं ज्या परीस्थितीला सामोरे जात आहेत.त्यांच्या शिक्षणांचा दर्जा,तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास,व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया लक्षात घेतली तर अनेक विद्यार्थी माघारी फिरले आहेत ही संख्या आज अर्धालाखापेक्षा अधिक आहे ती हळूहळू उंचावेल अशी निश्चित आशा आहे.

त्यामुळे जोपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळा आहेत तो पर्यंत मराठी भाषा जीवंत राहाणारच आहे हे मात्र निश्चित.करायचे असेल तर सरकारी कामात,प्रशासकिय कार्यात आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्थानिक भाषेत व्यवहार होण्याची सरकारी भूमिकेची अमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या