श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती शिवारात सिद्धीविनायक रोड परिसरात साईश्रध्दा कॉलनी येथे काल पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. तर रात्री रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास याच भागात लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या अडकला.
मोरगे वस्ती येथे राहणारे सागर जावळे यांच्या घराबाहेर जर्मन शेफर्ड कुत्र्यावर बिबट्याने महिन्यांपुर्वी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. तसेच श्री. झिने यांच्या कुत्र्यालाही बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. तसेच काही दिवसापुर्वी याच परिसरात एका घरासमोर तीन बिबटे फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
नागरिकांच्या मागणीनंतर मोरगे वस्ती परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावण्यात आले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यात काल शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. तर रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पसरताच नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. जेरबंद झालेले बिबटे वनविभागाने ताब्यात घेतले आहेत.
बिबट्या जेरबंद झाल्याने मोरगे वस्ती, म्हाडा कॉलनीसह परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी परिसरात आणखी एक बिबट्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.




