मुंबई । Mumbai
देशभरात दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण असताना कबड्डीच्या जगतातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मधील दोन महत्त्वाच्या संघांचे सदस्य जयपूर पिंक पँथर्सचे असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा आणि यू मुंबाचे युवा खेळाडू बालाभारती यांचे अकाली निधन झाले आहे. अवघ्या तरुण वयातच दोघांनी जगाचा निरोप घेतल्याने कबड्डी विश्वात आणि त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
दुहेरी दुःखद बातमीने धक्का दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही दुहेरी दुःखद बातमी समोर आली, ज्यामुळे प्रो कबड्डी लीगला मोठा धक्का बसला आहे. वेदांत देवाडिगा यांचे वय अवघे २३ वर्षे होते, तर यू मुंबाचे युवा खेळाडू बालाभारती हे केवळ २० वर्षांचे होते. इतक्या कमी वयात झालेल्या या निधनामुळे क्रीडा जगतातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
जयपूर पिंक पँथर्सकडून शोक व्यक्त जयपूर पिंक पँथर्स संघाने त्यांचे असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पोस्टद्वारे तीव्र दुःख व्यक्त केले. “आमचे सहाय्यक मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या अकाली निधनाने जयपूर पिंक पँथर्स परिवार अत्यंत दुःखी आहे. ते आमच्या कुटुंबाचे एक प्रिय सदस्य होते आणि त्यांच्यातील खेळभावना (पॅशन) व समर्पणाची आम्हाला खूप आठवण येईल. या कठीण काळात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असे संघाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यू मुंबाने गमावला युवा सितारा यू मुंबा संघानेही आपला युवा खेळाडू बालाभारती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “या वर्षाच्या सुरुवातीला युवा मुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालाभारती यांच्या अकाली निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या अत्यंत कठीण वेळी आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि टीमच्या सहकाऱ्यांसोबत आहेत.”
बालाभारती यांची कारकीर्द बालाभारती यांचा जन्म ३० ऑक्टोबर २००५ रोजी पाँडिचेरी येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना खेळाची आवड होती. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी कबड्डीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्यांनी राईट कॉर्नर डिफेंडर म्हणून आपली ओळख निर्माण केली. बालाभारतीने आतापर्यंत ३३ मॅचेस खेळल्या होत्या आणि त्यांच्या नावावर ५५ गुणांची नोंद आहे. त्यांच्या या कमी पण प्रभावी कारकिर्दीमुळे कबड्डी क्षेत्रातील एका उदयोन्मुख खेळाडूची एक्झिट झाली आहे. या दुहेरी धक्क्यामुळे प्रो कबड्डी लीगवर आलेल्या या संकटकाळात दोन्ही कुटुंबांच्या दुःखात कबड्डी विश्व सहभागी झाले आहे.




