Saturday, July 27, 2024
Homeनगरनामांकित कंपनीच्या चहा पावडरची बनावटगिरी

नामांकित कंपनीच्या चहा पावडरची बनावटगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नामांकित कंपनीच्या चहा पावडरशी साम्य असणारे बनावट चहा विकणार्‍या दुकानदारावर छापा टाकून 20 बनावट चहाचे पाऊच जप्त करण्यात आले आहेत. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्यासह कंपनीच्या संयुक्त पथकाने येथील डाळमंडई भागात बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सागर ट्रेडर्सचा मालक सागर विलास मुनोत (रा. दाळमंडई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (परळी, मुंबई) कंपनीचे सेल्स मॅनेजर अजय रामचंद्र मोरे (वय 47, रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्यावतीने सपट परिवार चहा पावडरची विक्री केली जात आहे. कंपनीच्या नावाशी साम्य व कंपनीच्या नावाचा लोगो वापरून बनावट चहा पावडरची विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. कंपनीचे प्रतिनिधी मोरे, सुरज साळवे, किरण पानमळकर, विठ्ठल महाजन आणि कंपनीचे वकील अजयकुमार सोळंकी यांच्यासह बुधवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन पोलीस संरक्षणाबाबतचे पत्र दिले. अधीक्षक पाटील यांनी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कातकडे यांना आदेश दिले.

उपअधीक्षक कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अभय कदम, अतुल काजळे, सलिम शेख आणि दोन पंच घेऊन कंपनीच्या प्रतिनिधींनी दाळमंडई येथील सागर ट्रेडर्स या दुकानावर सायंकाळी छापा टाकला. दुकानाचे मालक सागर मुनोत याला कंपनीच्या प्रतिनिधींनी ओळख सांगून पंचांसमक्ष या दुकानाची झडती घेतली. सपट परिवार चहा नावाचे 10 रुपये किंमतीचे 20 बनावट पाऊच याठिकाणी आढळून आले. हा माल जप्त करण्यात आला असून दोन पाऊच प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या