मुंबई | Mumbai
सध्या राज्यासह देशभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट चर्चेत आहे. शिवप्रेमींनी ‘छावा’ सिनेमाला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. या चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेत अभिनेते डॉ.अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले. या प्रश्नांची उत्तरे आता खुद्द डॉ. अमोल कोल्हे यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहेत.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्यासंदर्भात कुणाचा दबाव होता का? यामध्ये काही राजकीय हेतू होता का? आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ महाराजांचा अंत न दाखविण्यामागे शरद पवारांची काही विशेष सूचना होती का? या चार प्रश्नांची उत्तरे डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहेत.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये हा खुलासा केला आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का?”, “स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कोणाचा दबाव होता का?” या सध्याच्या चर्चेतल्या प्रश्नांना उत्तर देताना अमोल कोल्हेंनी खुलासा करताना म्हणाले, “होय..! स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता.”
“मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला. नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचे बलिदान दाखवले असते तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम झाला असता. हा विचार आम्ही करणे गरजेचे होते,” असे ते म्हणाले.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपन केले तेव्हा पाहिली, त्यामुळे २०१९च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवले जातेय, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती. असा खुलासा कोल्हेंनी केला आहे. शरद पवारांनी कधीही शब्दानेही अमुक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असे सांगितले नव्हते, तेव्हा शरद पवारांनी ही मालिका पाहिली देखील नव्हती. शरद पवारांनी मालिका पाहिली ती कोवीडच्या काळामध्ये जेव्हा मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण झाले त्यावेळी त्यांनी ही मालिका पाहिली. त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणालातरी खूश करण्यासाठी मालिकेचा शेवट दाखवला नाही असा खोटा प्रचार करणे हा धादांत खोटा प्रचार असल्याचेही यावेळी कोल्हेंनी म्हटले आहे.
दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवतोय. या चित्रपटाचा क्लायमॅक्स बघून प्रेक्षक थिएटरमधून पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर येत आहेत. मात्र माध्यमांच्या दबावामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटी ते सर्व काही दाखवले नाही, असे कोल्हेंनी स्पष्ट केलेय. चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये आणि त्यांच्या प्रेक्षकवर्गामुळे खूप फरक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा