Monday, November 25, 2024
Homeब्लॉगBlog : यादों की बारात...

Blog : यादों की बारात…

शिरीष कणेकरांच्या वडिलांनी एकदा त्यांना म्हटलं होतं, ‘मिस्टर शिरीष, तुम्ही कधीच कंटाळवाणे लिहीत नाही’. मी तर म्हणेन, कणेकरांसारखी वाचकांना खिळवून ठेवणारी आणि विविध विषयांवर तेवढ्याच ताकदीने लिहिलेली, गर्म-नर्म विनोदाने नटलेली आणि तरीही कळत-नकळत काहीतरी सांगून जाणारी व केव्हा केव्हा डोळे ओले करणारी शैली फार क्वचित पाहायला मिळते. आज मात्र त्यांच्या निधनामुळे एक सव्यसाची मराठी लेखक, पत्रकार, मुलाखतकार, स्टँडअप कॉमेडी शोमन महाराष्ट्राने गमावला आहे. मी वाचलेले त्यांचे पहिले पुस्तक क्रिकेट वेध… क्रिकेट वरचे! इतके सुरेख पुस्तक मी तरी वाचले नाही. खेळाडूंचे अलग-अलग पैलू उलगडताना त्यांनी दिलेला विनोदी फोडणीचा तडका इतका मस्त जमला होता की विचारू नका. क्रिकेटवरचे किस्से ऐकण्यात मजा असते, पण वाचण्यातही खूप गम्मत असते हे तेव्हा कळले. या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या सुनील गावस्कर यांनी दिलखुलास दाद देताना म्हटलंय, माझी विकेट कधी गेली हे कळले पण नाही…

फिल्मी हस्तिया हे तर त्यांचे सखे सोबती… त्यांच्याविषयी लिहिताना तर ते इतके भावुक होऊन जात की विचारू नका. ‘गाये चला जा’ हे संगीतकारांवर लिहिलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे आमच्यासारख्या फिल्मवेड्या रसिकांसाठी संपूर्ण लुटावा, असा खजिना होता. सी रामचंद्र काय, मदन मोहन काय, एस डी बर्मन काय; हे तर आमचे हिरो होतेच. त्यांना आम्हीही कोळून प्यायलो आहे, पण त्या आधीचे अनिल विश्वास, सज्जाद हुसेन, के. दत्तासारख्या मंडळींचे मोठेपण कणेकरांच्या लेखामुळे कळले. त्या काळात गुगल मावशी नव्हत्या, पण शिरीष सरांचे फिल्मी गीतांचे ज्ञान व स्मरणशक्ती इतकी अफाट होती की, गुगलबाई धन्य झाल्या असत्या. या मोठ्या मंडळींच्या आवड-निवडी, प्रेम-द्वेष ,हितसंबंध, त्यांचे सहकलाकारांविषयीचे मत याची खुसखुशीत माहिती ते देतात.

- Advertisement -

‘यादों की बारात’ हा असाच एक फिल्मी नायक, नायिका, गीतकार संगीतकारांवरचा मास्टरपीस… कधी अंजारत कधी गोंजारत, कधी चिमटे काढत तर कधी शाल जोडीतले देत त्यांनी साकारलेलं व्यक्तिचित्रण वाचणे हा एक सुखद अनुभव होता. हे सारे लहान मोठे, यशस्वी-अयशस्वी, नामवंत आणि अगदी अनामिकही असलेल्या कलाकारांचे त्यांनी केलेलं चित्रण अप्रतिम होते. त्यांची सगळी मते आपल्याला मान्य होतील असे नाही, त्यांनीही तसा हट्ट कधी धरला नाही, पण ज्या तळमळीने व ज्या पोटतिडीकेने ते लिहित त्यासाठी त्यांना सलाम केलाच पाहिजे. पुन्हा आलेलं ‘यादो की बारात’ असेच विलक्षण वाचनीय होतं. फिल्लमबाजी हा त्यांचा शो आणि त्याचे पुस्तकही मजेशीर होते.

हिंदी सिनेमा, त्यातले कलाकार हा त्यांचा वीक पॉइंट असला तरी त्यांनी फक्त या विषयाला आपल्याकडे ओलीस ठेवले नाही. त्यांची प्रवास वर्णने निव्वळ लाजवाब होती. अमेरिकेवर लिहिलेलं डॉलरच्या देशा आणि नानकटाई निव्वळ शाही तुकडा. त्यातला विनोदी लेखदेखील कासावीस करणारा, डोळ्यांच्या कडा भिजवणारा, मराठी साहित्याला मिळालेली खरी कणेकरी देणगी हीच हे माझे ठाम मत आहे. हे असे विनोदाच्या अंगाने जात जात अचानक काळजाला घरे पडणारी ही त्यांची भाषा त्यांना लेखकांतला राजेश खन्ना बनवते. तसेही काका त्यांचा दोस्त, पण ते त्याची नेहमी फिरकी घ्यायचे. किमान पुस्तकात तरी. या सुपर स्टारने ‘पुन्हा यादों की बारात’साठी प्रास्तविक लिहिले आहे. कोणी सांगावे, ते कणेकर साहेबांनी लिहिले असेल, पण ते जमले आहे मस्त! त्यांच्याच एका पुस्तकाच्या नावासारखे…’मेतकूट’ जमल्यासारखे…!

लता मंगेशकरांनी त्यांच्या पहिल्या बारातीसाठी प्रास्तविक लिहिले आहे. त्या त्यांच्या लेखनावर फिदा होत्या. त्या कणेकरांना गोष्टीवेल्हाळ म्हणायच्या. त्यांचे किस्से त्यांना फार आवडायचे, पण त्या खुश होत्या ते या लेखकाच्या कलाकाराचे अंतरंग, वेदना, संवेदना उलगडून दाखवणाऱ्या नितांत सुंदर शैलीवर…!

पुढे त्यांनी बरीच पुस्तके प्रकाशित केली. इरसालकी, चापलुसकी, लगाव बत्ती, गोळी मार भेजेमे सारखी कॅची नावे असलेली त्यांची पुस्तके भन्नाट होती, पण मला भावलेलं त्यांचं एक पुस्तक म्हणजे कणेकरांचा मुलगा…! यातले शिरीष कणेकर वेगळे आहेत आणि अस्सल पण आहेत.

शिरीष कणेकर यांचे टॉक शो छान असायचे. ‘फिल्लमबाजी’चे अनेक प्रयोग झाले. ते स्वतः गप्पा मारताना फारसे ड्रामा करायचे नाहीत. किंबहुना त्यांचा तसे न करण्यावर भर होता, पण त्यांचे किस्से व पंचेस असे सॉलिड असायचे की, प्रेक्षक वर्ग मात्र पोट धरून हसत असायचा.

आपल्या ऐंशीव्या वाढदिवशी त्यांनी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. त्यांची भाषा, त्यांचा नेहमीचा तो कणेकरी टच पाहून वाटले नाही त्यांच्या मंडेटरी ओव्हर संपत आल्या आहेत, पण हा ओवरचा हिशेब त्या जगंनियंत्याचा होता. त्यासमोर अपील नव्हते. त्यांनी आपल्या लाडक्या विक्टर ट्रंपरप्रमाणे चमकदार फलंदाजी केली आणि पंचांनी बाद दिल्यावर डब्लु जी ग्रेससारखी कोणतीही हुज्जत न घालता तंबूचा रस्ता धरला. त्यांची फटकेबाजी व फिल्लमबाजी खास कणेकरी अंदाजमे आता स्वर्गात रंगेल.

– डॉ अरुण स्वादी

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या