मुंबई | Mumbai
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज देशभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने सकाळपासूनच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे. मुंबईतील चैत्यभूमी परिसरात पहाटेपासूनच अनुयायांची मोठी गर्दी उसळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनम्र अभिवादन करत एक्सवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या केवळ सामाजिकच नव्हे तर अफाट आर्थिक ज्ञानाचा उल्लेख केला आहे. सध्याच्या राजकारणावर कडक शब्दांत प्रहार केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.
पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.
ऐन निवडणुकीच्या काळात नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांचा भाजपला रामराम, तृणमूलमध्ये प्रवेश
छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू !
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. त्या वर्गाला प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत राहील ! बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन, असे राज ठाकरे म्हणाले.




