अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरीच्या डॉ. बाबुराव सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025 साठी प्रारूप मतदार यादी सोमवार (दि.3) रोजी जाहीर झाली आहे. या प्रारूप मतदार यादीवर येत्या 12 तारखेपर्यंत तर मागील महिन्यांत जाहीर झालेल्या संगमनेरच्या थोरात आणि प्रवरानगरच्या डॉ. विखे पाटील साखर कारखान्यांच्या प्रारूप यादीवर हरकती घेण्यासाठी 6 मार्च ही अखेरची मुदत असल्याची माहिती जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्यावतीने देण्यात आली.
नगर जिल्ह्यातील सहकारातील मोठ्या संस्था असणार्या आणि संगमनेर, राहाता आणि राहुरी तालुक्यातील महत्वाच्या असणार्या थोरात, प्रवरानगरच्या विखे पाटील आणि राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्यांची निवडणूक रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. या तिनही साखर कारखान्यांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. यातील डॉ. तनपुरे साखर कारखान्यासाठी सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली असून येत्या 12 तारखेपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. तनपुरे साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीत 21 हजार मतदार असून संस्थांचे 190 ठराव आहेत. यावर 24 मार्चला सुनावणी होऊन 28 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, संगमनेरच्या थोरात आणि प्रवरेच्या डॉ.विखे पाटील साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीवर सुनावणी होऊन 21 मार्चला या दोन साखर कारखान्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक होणार्या थोरात साखर कारखान्यासाठी 19 हजार सभासद असून प्रवरानगरच्या डॉ. विखे पाटील साखर कारखान्यांत 11 हजार सभासद आहेत.
लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी
निवडणूका होणार्या संगमनेर, डॉ. विखे पाटील आणि डॉ. तनपुरे साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. साधारणपणे महिलाअखेर या निवडी होणार असल्याचे सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी सहकार आणि प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाच्यावीने तयारी सुरू करण्यात आली आहे.