आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर राहिला आहे.काही लोक या तालुक्यात गडबड करण्याच्या हेतूने येऊन युवकांना वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना माझे सांगणे आहे, की हा तालुका कायम सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व आमदार थोरात यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. जनता सूज्ञ असून परकीय आक्रमण उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
युवा संवाद यात्रेनिमित्ताने आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथे त्या बोलत होत्या. आपला तालुका सहकारामध्ये अग्रेसर असून येथील संस्था एक नंबरच्या आहेत. तालुक्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. परंतु काही लोकांना संगमनेर तालुक्याचा विकास पाहवत नाही म्हणून येथे येऊन फोडाफोडीचे राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना आपण पाहत आहोत. परंतु संगमनेर तालुका कायमच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. महायुती सरकारच्या काळात सत्ताधार्यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेला त्रास देण्याचे काम केले. अनेक खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचे काम केले.
मात्र, जनता सूज्ञ असून परकीय आक्रमण कधीही सहन करणार नाही. तालुक्यातील आर्थिक घडी अतिशय भक्कम असून येणार्या काळात जनताच महायुतीला धडा शिकवणार असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमदार थोरात यांना राज्याच्या नेतृत्वाबरोबरच दिल्लीतही कार्यकारिणी समितीमध्ये मानाचे स्थान असून याचा सन्मान संगमनेर तालुक्याने राखला पाहिजे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपली जबाबदारी पार पाडूया, असे आवाहनही डॉ. जयश्री थोरात यांनी केले.