संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
धांदरफळ येथील सभेत माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले तर तिथे आठ तास बाहेर बसवून ठेवले, पुन्हा माझ्यावरच गुन्हा दाखल केला. हा कोणता तुमचा न्याय आहे? मात्र, मी स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरातांची नात असून आमदार बाळासाहेब थोरातांची मुलगी आहे. त्यामुळे मी हारणारी नसून लढणारी आहे, असे डॉ. जयश्री थोरात यांनी ठणकावून सांगितले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्याचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी आमदार बाळासाहेब थोरातांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात उमटले आहेत. यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत वसंतराव देशमुख यांच्यासह डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अटकेची मागणी केली होती. यानंतर शनिवारी रात्री डॉ. जयश्री थोरात यांच्यासह जवळपास पन्नास लोकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे रविवारी सकाळी पुन्हा महिला चांगल्याच संतप्त होऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकत्र आल्या होत्या.
यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या, तुम्ही माझी बदनामी करून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये माझी काय चूक आहे. अटक करायची असेल तर मला अटक करा, पण माझ्यामुळे ऐन सणासुदीत कोणाला अटक करू नका. भर सभेमध्ये माझी एवढी टिंगल केली जाते ही तुमची कोणती सभ्यता आहे. राजकारण केले पाहिजे परंतु इतक्या खालच्या पातळीवर जाऊन नाही केले पाहिजे. न्याय मागण्यासाठी आठ तास पोलीस ठाण्याबाहेर बसवून ठेवण्यात आले हे चुकीचे नाही का? प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे? माझ्याबद्दल भरसभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि वरून माझ्यावरच गुन्हा दाखल केला आहे, यावरुन मला न्याय कसा मिळणार त्यापेक्षा तुम्ही मलाच अटक करा. अशा एक ना अनेक प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले.
तालुका पोलीस स्टेशनसमोर सर्व जमलेलो होतो. मागणी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने होती. तरी अशावेळेस गुन्हे दाखल होतात. येथे कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही हाच प्रश्न आहे. मणिपूर आणि बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती त्यांनी केली आहे.
– दुर्गा तांबे (माजी नगराध्यक्षा-संगमनेर)