मुंबई | Mumbai
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (१८ डिसेंबर) रोजी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे घराणे म्हणून सातव घराण्याची ओळख आहे. विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या डॉ.प्रज्ञाताई सातव ह्या काँग्रेसकडून दोन टर्म आमदार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. आज (१८ डिसेंबर) रोजी त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
एकेकाळी हिंगोली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, कालांतराने राजकीय समीकरणांमध्ये बदल होत गेले. गटबाजी, नेत्यांमधील नाराजी, याचा थेट फटका काँग्रेसला बसला. दरम्यान, अशातच हिंगोलीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. प्रज्ञा सातव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज गुरुवारी मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होईल. या प्रवेशासाठी बुधवारीच कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, डॉ. प्रज्ञा सातव आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी समर्थकांसह आल्या आहेत. हिंगोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ‘राजीव सातव अमर रहे’ म्हणत घोषणाही देण्यात आल्या. हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात सातव यांचे कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत.
कोण आहे डॉ. प्रज्ञा सातव
डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव या गांधी घराण्याच्या अत्यंत जवळच्या मानल्या जात होत्या. २०१४ ते २०१९ या काळात राजीव सातव हे हिंगोलीचे खासदार होते. दरम्यान २०२१ साली त्यांचे आजारपणामुळे निधन झाले. दरम्यान, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून, सातव सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. मात्र, काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




