चांदवड | प्रतिनिधी
तालुक्यातील ४४ गाव पाणीपुरवठा योजनेत जेवढे पाणी प्रत्यक्षात उचलले जाते तेवढे पाणी पोहचत नाही याचे एका महिन्यात ऑडिट केले जाईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल. टेंडर होऊन देखील काम केले नाही म्हणून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच मागणी करून देखील नागरिकांना नळजोडणी मिळत नाही तर दुसरीकडे काहींना तीन ते चार इंची जोडणी दिली जाते. याची चौकशी करण्यात येवून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देतांना दिली.
तालुक्यातील जनतेसाठी जलसंजविनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ४४ गाव पाणीपुरवठा योजनेत पाण्याची एकूण उचल, वाटपातील तफावतीने सततचा विस्कळीत होणारा पाणीपुरवठा तसेच दुरुस्तीसाठी १५ कोटीचा निधी असून देखील ठेकेदाराने २ वर्ष उलटूनही काम पूर्ण केले नाही यावर आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत तालुक्यातील ६० गावांतील जनतेच्या जिव्हाळाच्या पाणी प्रश्नांला विधानसभेत वाचा फोडली.
चांदवड तालुका हा अवर्षण प्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यंदा जानेवारी महिन्यापासून तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. विहिरी, कुंपनलिका कोरडे पडायला सुरुवात झाली आहे. पर्यायाने पिण्याच्या पाण्याची चिंता नागरिकांना भेडसावत आहे. अशा बिकट परिस्थितीतही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे चांदवड तालुक्यातील गावांना सतत विस्कळीत पाणीपुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी पाईपलाईन खराब असेल त्या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा योजनेद्वारे सर्व नियमित पाणीपुरवठा करावा अशा सूचना स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परंतु चांदवड येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची एकूण उचल व एकूण वाटपामध्ये मोठी तफावत असल्यामुळे सतत विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने या योजनेद्वारे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनाने कार्यवाही करावी याबाबत लक्षवेधी सादर करत आमदार आहेर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
दोन पंपांची क्षमता ८० लाख लिटर प्रतिदिन, पण वितरण फक्त पाच-दहा लाख लिटर, ८० टक्के पाणी रोज बाया जात आहे. ९० लाख लिटर पाण्याची मागणी पण साठवण क्षमता फक्त ५५ लाख लिटर गावांना आठ-दहा दिवसांत पाणी मिळावे असे नियोजन, मात्र बऱ्याचदा पाणीगळती रोखताना पंधरा ते वीस दिवस जातात आणि नागरिकांना अगदी महिन्याने पाणी मिळते. एखाद्या गावाने मागणी केल्यास एक इंची पाइपलाइन मिळत नाही पण काही ठिकाणी बेकायदेशीर जोडणीला तीन चार इंची पाइप टाकले आहेत. २०२२ मध्ये मंजूर १५ कोटींच्या निधीचे काय झाले ? २०२५ उजाडले तरी पाइपलाइन दुरुस्त का नाही ? नवीन पंप का नाही? या सर्व प्रकारचे ऑडिट करणार का? या प्रश्नांचा भडीमार आ.डॉ. आहेर यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा