अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात पडू नका. राजकीय व्यक्तीचे राजकीय आणि व्यक्तिगत असे दोन वेगळे आयुष्य असते. राजकीय भूमिकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात; मात्र व्यक्तिगत आयुष्याची मर्यादा जपली पाहिजे. त्यामुळे राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवावे, असा सल्ला भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांना दिला.
नगरमध्ये माध्यमांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणण्याचे काम आजपर्यंत पवार परिवारानेही केले नाही आणि विखे पाटील परिवारानेही केले नाही. गेल्या काही वर्षांत खासदारांवर विविध आरोप झाले, काही कॉल रेकॉर्डिंगचीही चर्चा झाली; मात्र आपण कधीही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केलेले नाही.समाज आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कौटुंबिक विषयांना राजकीय मुद्दा बनविणे योग्य नाही. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वांची आहे. राजकीय टीका करताना कौटुंबिक टीका होऊ नये; अन्यथा राजकारणातील लक्ष्मणरेषाच संपेल, असेही डॉ. विखे यांनी सांगितले. मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने आम्ही मोठे किंवा लहान होणार नाही. जनसामान्यांचे कल्याण आणि जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपला कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नसल्याचेही डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. माझ्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे म्हणून मी कुठेही धावत नाही. मी जिल्हा बँकेचा चेअरमन होणार असल्याचे कधी म्हटले आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना योग्य समजतील, तेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होतील. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे ते म्हणाले. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत. देशासह जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळते का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,फफ असे डॉ. विखे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी काम करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जी गोष्ट झालीच नाही, त्यावर आंदोलन कशासाठी ?
डिंबे-माणिकडोह प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याच्या चर्चेवरून 5 तारखेला आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, माझ्या माहितीनुसार या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे स्थगितीचा आदेश नसताना त्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेणे योग्य नाही, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. काम सुरू झाले नाही किंवा लेखी आश्वासन मिळाले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्या निवेदनाला जलसंपदा विभाग योग्य ते उत्तर देईल. मात्र, प्रकल्पाला स्थगितीचा कोणताही आदेश नसताना त्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेणे हा काहीसा हास्यास्पद प्रकार आहे,फफ असे ते म्हणाले.
काहींना सत्तेत येण्याची घाई
गेल्या 40-50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून, मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून प्रकल्पाचे काम लवकर सुरू होईल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी गेल्या तीन-चार दशकांत अनेकांनी संघर्ष केला आहे. प्रत्येकाचे योगदान मान्य केले पाहिजे. राज्यातील दुष्काळ, शेतकर्यांना मदत, विद्यार्थ्यांची फी माफी आदी प्रश्नांवर विरोधक सरकारवर टीका करत आहेत. विरोधकांचे काम टीका करणे आहे, ते ते करत आहेत. काहींना सत्तेत येण्याची घाई झाली आहे; मात्र हे त्यांचे स्वप्नच राहील, असा दावा डॉ. विखे यांनी केला.




