Sunday, October 20, 2024
Homeनगरडॉ. सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा म्हणाले, मुख्यमंत्रीपद सोडा यंदा…

डॉ. सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा म्हणाले, मुख्यमंत्रीपद सोडा यंदा…

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

आजची सभा हा ट्रेलर आहे. या तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी महिलांचा वाटा खूप मोठा असणार आहे. युवकांनी सुध्दा मागे न राहता दहशत झुगारून परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे. तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होवू शकणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

वर्षानुवर्ष या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात, असा प्रश्न डॉ. सुजय विखे पाटील यांनी करून या तालुक्यात फक्त नातेवाईकांसाठी राजकारण झाले. नाते, ठेकेदार आणि जमिनीचा ताबा मिळवणारे एवढीच ओळख पदे वाटताना दाखवली जाते. पण तळेगाव, निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परिवर्तन केले. असेच परिवर्तन आता येणार्‍या विधानसभा निवडणुकीत करायचे असून दोन दिवसांत पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला येईल असा विश्वास व्यक्त केला.

चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पदे मिळाली. पण निधी आणता आला नाही. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचे पाणी आले. अनेक वर्ष फक्त विखे पाटील परिवारावर टीका केली. पण साईबाबांच्या आशीर्वादाने विखे पाटील कुटुंबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे पाणी आणून दाखवले. आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा आहे. पाकीट संस्कृतीत वाढलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी थोरात गटाचा समाचार घेतला.

संगमनेर भाजपाच लढणार
डॉ. सुजय विखेंना तिकीट नाकारले अशा चर्चा जाणीवपूर्वक पेरल्या. कोणत्या सूत्रांची माहिती आहे ते तुम्हांला माहीत आहे. यशोधनच्या सूत्रांवर विश्वास ठेवू नका. संगमनेरचा मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या