संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील जनतेने तुमचा चाळीस वर्षांचा कारभार पाहिला आहे. तालुक्यातील आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचे कारण काय? अहो ताई, लोकशाही प्रक्रीयेत मायबाप जनता बाप असते. तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल, असे सडेतोड उतर डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले. साकूर येथे आयोजित युवा संकल्प मेळाव्यात डॉ.सुजय विखे यांनी पुन्हा एकदा आ.बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून टिकेचा भडिमार केला. चाळीस वर्षे सर्व सत्ता असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी नाही.
या भागात युवकांना रोजगाराच्या संधी नाहीत. या निष्क्रीयतेवर बोललो तर तुम्ही थेट बाप काढला. आमच्या भागात येऊन आमच्या वडिलांवर वाटेल तशी टीका केली. पण आम्ही संयम दाखवला. संगमनेर तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही आलो आहोत. साकूरची सभा प्रस्थापितांच्या विरोधातील परिवर्तनाची नांदी असल्याचा इशारा डॉ.विखे पाटील यांनी दिला.
वर्षानुवर्षे ज्या जनतेने निवडून दिले त्यांचा बाप तालुक्याच्या राजकन्या काढायला निघाल्या. या विधानसभा निवडणुकीत जनता ठरवेल तालुक्याचा बाप कोण आहे. ताईच्या गाडीत बसणारे त्यांना बोलायला भाग पाडत आहेत. ताईच्या गाडीत बसलेले लोकच त्यांचा घात करणार आहेत. युवकांनी प्रस्थापितांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बाबासाहेब कुटे गुलाबराजे शेळके यांच्यासह अनेक सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीला पाठिंबा दिला.