Sunday, November 24, 2024
Homeनगरदशक्रियाविधी असेल तरी सांगा कावळ्या आधी सुजय विखे हजर असेल

दशक्रियाविधी असेल तरी सांगा कावळ्या आधी सुजय विखे हजर असेल

डॉ. सुजय विखे यांचे गंमतीशीर वक्तव्य

राहाता |वार्ताहर| Rahata

आता मला मोकळा वेळ आहे. मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवा मी लगेच येईल. अगदी दशक्रियाविधीला कावळ्याच्या काकस्पर्शाआधी सुजय विखे हजर राहील, असे गंमतीशीर विधान डॉ. सुजय विखे यांनी गणेशनगर येथील एका कार्यक्रमात करताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या वेगळ्या शैलीत फटकेबाजी करत उपस्थित नागरिकांना हसवले. यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी धडा घेतला आहे. लोकांना विकास कामे करणारा नेता नको. सेल्फी व मनोरंजन करणारा नेता पाहिजे. त्यामुळे मी 24 तास आता नागरिकांच्या विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध राहण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

कार्यकर्त्यांनी मला कधीही फोन करा मी हजर राहील. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, जागरण-गोंधळ कार्यक्रमाबरोबरच अगदी दशक्रिया विधीला देखील कावळ्याच्या काक स्पर्शाआधी सुजय विखे त्या ठिकाणी हजर राहील. जागरण गोंधळाच्या दिवशी लंगर तोडायला देखील मी पहाटेच उपस्थित राहील. त्यामुळे तुम्ही आता चिंता करू नका फक्त मला फोन करा मी लगेच हजर ! अशी मुश्किल भाष्य त्यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्याचा फवारा उडाला. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांना कामाचा व्याप मोठा आहे. एका कार्यकर्त्यांने मला सांगितले, मी नामदारांना माझ्या नवीन गाडीच्या उद्घाटनासाठी बोलवले होते.

मात्र आता गाडीचे टायर बदलण्याची वेळ आली, परंतू साहेबांना वेळ नसल्यामुळे ते आले नाही. मी त्याला सांगितले, घाबरू नकोस आता माझ्याकडे वेळच वेळ आहे. फक्त तुम्ही मला आता विकास कामे सांगू नका कारण जनतेला विकास कामे करणारा नाही तर सेल्फी काढणारा व छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणारा नेता आवडतो हे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे तुम्ही आता कुठलीही शंका मनात ठेवू नका मला फक्त फोन करा, अशा मिस्किल शैलीत त्यांनी फटकेबाजी केली. आपल्या प्रत्येक भाषणात वेगळ्या प्रकारची गुगली टाकून विरोधकांना आपल्या भाषणातून मार्मिक चपराक देणारे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या भाषणांची जोरदार चर्चा सुरू असून ते काय बोलणार व कोणाला उद्देशून बोलणार याची कार्यकर्त्यांना व विरोधकांना देखील उत्सुकता असते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या