अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी डॉ. सुजय विखे यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या या निवडीला सहकार न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, याप्रकरणी न्यायालयाने डॉ. सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याने केलेल्या मागण्या मान्य का करू नयेत, याबाबत 16 नोव्हेंबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायाधीश श्वेता व्ही. मोरे-पाटील यांनी दिले आहेत. अॅड. सुरेश लगड यांनी ही माहिती दिली.
एकनाथ चंद्रभान घोगरे यांच्या वतीने अॅड. लगड यांनी सहकार न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. डॉ. विखे यांनी राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर याच मतदारसंघातून एकनाथ घोगरे यांनीही अर्ज दाखल केला होता. याचिकेतील माहितीनुसार, सुजय विखे हे सन 2016 ते 2023 या कालावधीत तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत होते. या कारखान्याने जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. संबंधित कर्ज थकीत झाल्यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने वैयक्तिक हमीच्या आधारे पुन्हा कर्जाची मागणी केली होती. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर तेही थकीत राहिल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सुजय विखे हे थकबाकीदार ठरत असल्याने त्यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील नामनिर्देशन अर्ज नामंजूर करावा, अशी हरकत एकनाथ घोगरे यांनी घेतली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ही हरकत फेटाळून लावल्याने घोगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 22 ऑक्टोबर रोजी ही याचिका निकाली काढताना याचिकाकर्त्याला सहकार न्यायालयात दाद मागणे योग्य ठरेल, असे नमूद केले होते. त्यानंतर घोगरे यांनी सहकार न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. याचिकेतील मागण्यांच्या अनुषंगाने सहकार न्यायालयाने सुजय विखे यांच्यासह संबंधित संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याच्या मागण्या मान्य का करू नयेत, याबाबत 16 नोव्हेंबर रोजी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.




