अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा सूचना जारी केल्या आहेत.त्यामुळे यासाठी किती निविदा येतात व कुणाला हा कारखाना भाडेपट्ट्यावर चालविण्यास मिळतो यावर सर्वकाही अवलंबून आहे.
निविदा फॉर्म विक्रीची मुदत 12 ते 21 ऑक्टोबर 2023 आहे मालमत्ता पाहणी 22 ते 31 ऑक्टोबर दरम्यान करता येईल. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. या कारखान्याची गाळप क्षमता 4250 मे. टन प्रति दिवस आहे. किमान अपेक्षीत भाडे रक्कम 20 कोटी, अधिक जीएसटी आहे.
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेचा वित्तपुरवठा आहे. 2013 साली कारखान्यावर 60 कोटींच्या कर्जाची थकबाकी होती. तेव्हा, बँकेने कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त केली होती. 2016 साली कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले.
2017 साली 90 कोटी कर्जाचे पुनर्गठन होऊन, अकरा वर्षांसाठी मुद्दल, व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले. बँक व कारखाना व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय करार होऊन, बँकेने जप्त केलेली मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना 2017-18 पासून सुरू झाला. 2019-20 मध्ये ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. परिवर्तन मंडळाच्या सात वर्षांच्या काळात चार वर्षे कारखान्याचा ऊस गाळप हंगाम घेण्यात आला.
संचालक मंडळाची मुदतवाढ संपल्याने कारखान्यावर पुन्हा शासनातर्फे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जप्त करण्यात आली. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा ठराव अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गत महिन्यात मंजूर करण्यात आला होता. आता यासंदर्भात निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे.
कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून 48 कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु, सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठण करताना 90 कोटींची मुद्दल कायम राहिली. त्यावर ऑगस्ट 2023 अखेर 34 कोटी 72 लाख रूपये व्याजासह 124 कोटी 75 लाख रूपये कर्जाची थकबाकी झाली आहे.