Saturday, May 4, 2024
Homeनगरडॉ. तनपुरे कारखान्याचा जिल्हा बँकेने घेतला ताबा

डॉ. तनपुरे कारखान्याचा जिल्हा बँकेने घेतला ताबा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अखेर डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला असून बँकेने 35 सुरक्षा रक्षक कारखान्यावर तैनात केले आहेेत. कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने करारानुसार कारवाई केल्याचे समजते. मात्र, डॉ. तनपुरे कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँक विक्रीस काढते की कारखाना भाडेतत्वावर चालवयास देते, याकडे सर्व सभासद व कामगारांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेने वित्तपुरवठा केला आहे. सन 2013 साली कारखान्यावर 60 कोटींच्या कर्जाची थकबाकी होती. त्यानंतर बँकेने कारखान्याची चल, अचल मालमत्ता जप्तीची प्रक्रिया केली होती. सन 2016 साली कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले होते.

परंतु, सन 2017 साली 90 कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठन होऊन, अकरा वर्षांसाठी मुद्दल व व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले. जिल्हा बँक व कारखाना व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय करार होऊन, बँकेने जप्त केलेली कारखान्याची मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना सन 2017-18 पासून सुरू झाला. सन 2019-20 मध्ये ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. मागील वर्षी 4 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.

दरम्यान विद्यमान कारखाना संचालक मंडळाने चार वर्षे उसाचे गाळप करून सुमारे 48 कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु, सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठण करताना 90 कोटींची मुद्दल व 21 कोटींचे व्याज असे 111 कोटी थकीत कर्ज ऑक्टोबर 2022 अखेर बँकेला देणे बाकी राहिले आहे. बँकेने कर्जफेडीसाठी 500 ऐवजी 100 रुपये प्रतिक्विंटल साखरेवरील टॅगिंग करावे, असा कारखाना व्यवस्थापनाचा आग्रह होता. परंतु, त्यास बँकेने नकार दिल्याने यंदाच्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम चालविण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दाखविली.

कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेला मालमत्ता ताब्यात देण्याच्या सुपूर्दनाम्याची गरज नाही. गाळप हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने, द्विपक्षीय कराराचा भंग झाला आहे. करारातील अटी, शर्तीनुसार बँकेतर्फे कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केली आहे.

– नंदकुमार पाटील, सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी, एडीसीसी बँक, अहमदनगर.

- Advertisment -

ताज्या बातम्या