राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीपासून प्रशासनावर दबाव टाकून व सत्तेचा पुरेपूर वापर करत सर्वसामान्य खर्या सभासदांना वंचीत ठेवण्याचा डाव सत्ताधारी मंडळी करीत असल्याचा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. माजी मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरीच्या डॉ. बा.बा तनपुरे कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली असताना प्रारूप मतदार याद्या जाहीर होऊन हरकतीसाठी सभासद मतदारांना 12 मार्च 2025 ही शेवटची तारीख निवडणूक निर्णय आधिकार्यांनी दिलेली आहे. कारखाना बंद होण्यापूर्वी शेवटच्या झालेल्या करोना काळातील ऑनलाईन वार्षिक सभेत सभासदांची शेअर्स अनामत रक्कम दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.
तसेच काही सभासदांच्या नावे थकबाकी असल्याने त्यांची नावे मतदार यादीत आलेली नाहीत. दहा हजार शेअर्स असणार्याला सभासदाला मतदानाचा अधिकार राहील. परंतु निवडणूक लढविण्याचा अथवा सूचक व अनुमोदक होण्याचा अधिकार राहणार नाही, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून मिळालेले असल्याने इच्छुक उमेदवार व सभासद कारखाना कार्यस्थळावर उर्वरित रक्कम भरण्यासाठी तसेच थकबाकी भरण्यासाठी दि. 11 मार्च रोजी मोठ्या संख्येने जमा झाले होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नेमलेला संबंधित पैसे भरून घेणारा कर्मचारी जागेवर नसल्याने तसेच त्याचा दूरध्वनी बंद असल्याने व कारखाना मध्यवर्ती कार्यालयाला कुलूप असल्याने या सभासदांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही यंत्रणा सत्ताधार्यांनी पूर्णपणे हायजॅक केली असून निवडणूक प्रक्रियेपासून इच्छुकांना बाजूला ठेवण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होत असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला.
याबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे, त्याचप्रमाणे कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू व त्यांचे सहकारी, छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक व शिवसेना शिंदे गटाचे नेते राजूभाऊ शेटे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने कार्यस्थळावर जमा झाले होते. संबंधित कर्मचारी विवेकानंद नर्सिंग होम तसेच कारखाना कार्यस्थळावर मिळून न आल्याने मोठा संताप व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्वांनी त्याच्या दूरध्वनीवर संपर्क केला असता, तोही बंद सांगण्यात आला. यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अमृत धुमाळ व राजूभाऊ शेटे आदींनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही फोन उचलला नसल्याने सर्वच नेत्यांनी संताप व्यक्त केला.
राहुरीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर कार्यालय बंद असून ड्युटीवरील कर्मचारी हजेरी लावून त्या ठिकाणी नसल्याने व संपर्क होत नसल्याची तक्रार लेखी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. एक तर हरकतीसाठी शेअर्स अनामत व थकबाकी पूर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी व पूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राबविली जावी, अशी मागणी यावेळी सर्वच नेत्यांकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन देऊन त्याच्या प्रती प्रादेशिक साखर संचालक, पुणे, साखर संचालक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहिल्यानगर, सहाय्यक उपनिबंधक कार्यालय, राहुरी, तहसीलदार राहुरी, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण पारदर्शी न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला आहे. यावेळी ताराचंद तनपुरे, नंदकुमार तनपुरे, अशोक खुरूद, अरुण ढूस, नानासाहेब गाडे, संजय पोटे, दिलीप इंगळे, संदीप आढाव, राहुल तमनर, भरत पेरणे, सुखदेव मुसमाडे, नारायण जाधव आदींसह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्ताधारी नेते निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे हायजॅक करून सभासदांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असून लोकशाही प्रक्रिया यांना मान्यच नाही. आपल्या बगल-बच्च्यांचे शेअर्स अनामत व इतर रकमांचा भरणा करून इतरांची अडवणूक करून मनमानी करण्याचा प्रयत्न सत्ताधार्याकडून होत असल्याचा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, राजूभाऊ शेटे, अमृत धुमाळ, अरुण कडू आदी सभासदांनी केला.
सत्ताधारी गटाच्या कोल्हार गटातील एका नेत्याच्या घरात सत्ताधार्यांच्या बगलबच्चांच्या शेअर्स व थकबाकीच्या रकमा भरून पावत्या फाडण्याचे काम सुरू असल्याची माहिती एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली असल्याचेही कारखाना बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.