दिल्ली | Delhi
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नेतान्याहू यांच्या सिझेरिया शहरातील खासगी निवासस्थानाला ड्रोनने (Drone Attack) लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या वेळी नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी घरी हजर नव्हत्या, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याचीही माहिती मिळत आहे.
हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहला इराणचा पाठिंबा आहे. इस्राइलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले तीव्र करणार असल्याचा इशारा शुक्रवारी हिजबुल्लाहनं दिला होता.
दहशतवादी संघटनेचा कमांडर हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाह आणि इराण हे दोन्ही देश संतापले आहेत. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार यालाही इस्रायलनं ठार केलं आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांच्या हत्येमुळं युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.