Monday, June 24, 2024
Homeनगरदुष्काळाच्या संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या - आ. थोरात

दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

राज्याच्या विविध भागासह संगमनेर तालुक्यात पाऊस अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे येणारे वर्ष हे मोठे संकटाचे आहे. गावोगावी टँकरने पाणी पुरवठा करणे, रोजगार हमीची कामे उपलब्ध करुन देणे, जनावरांना चारा उपलब्ध करुन देणे ही कामे प्रशासनाला गांभीर्याने करावी लागणार आहेत, या कामामध्ये कुठलेही राजकारण व हलगर्जीपणा करु नका, दुष्काळी संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या, अशा सूचना माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

प्रांताधिकारी कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समवेत शंकरराव खेमनर, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, सौ. मीराताई शेटे, अजय फटांगरे, सिताराम राऊत, नवनाथ अरगडे, अशोक सातपुते, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, बी. आर. चकोर, प्रभाकर कांदळकर आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, अल निनोचा च्या प्रभावामुळे यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तालुक्यात अवघा 39 टक्के पाऊस झाला असून येणारे वर्ष हे मोठे संकटाचे आहे. या काळात प्रशासनाने जनतेच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने टँकर द्या. ज्या गावांमध्ये दहा मजूर असतील तेथे रोजगार हमीचे कामे सुरू करा. व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने पशुधनासाठीही चारा उपलब्ध होण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. दुष्काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे सरकारचे काम आहे. आपल्या काळात सुरू केलेल्या ई पीक पाहणीचा प्रोजेक्ट हा राज्यासाठी व देशासाठी दिशादर्शक आहे मात्र सध्याच्या सरकारला त्याचे गांभीर्य नाही.

आपण तालुक्यातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मधून 800 कोटींचा निधी मिळवला आहे. या योजना सुरळीतपणे चालवणे त्या गावांची जबाबदारी आहे. विजेच्या बाबत तालुक्यातील अनेक नागरिकांच्या मोठ्या तक्रारी असून थकीत बिलावर आकारले जाणारे 18 टक्के व्याज ही सावकारी दराच्या पुढे आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. दुष्काळ निवारण कामांमध्ये गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासह सर्व अधिकार्‍यांनी अत्यंत जबाबदारीने मदतीची भूमिका घ्या. याचबरोबर तालुक्यातील पाण्याचे नियोजन करताना एप्रिल मे महिन्याचे संकट डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने काम करावे.

तालुक्यात खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहे. त्यामुळे पिक विमा योजनेमधून तातडीने सर्व शेतकर्‍यांना मोठी मदत मिळावी अशी मागणी ही सरकारकडे केल्याचे आ. थोरात यांनी सांगितले.

शंकर पा. खेमनर म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुरावामुळे तालुक्यातील 5818 शेतकर्‍यांना कांद्याचे अनुदान मिळाले आहे. मात्र 1616 शेतकर्‍यांचे अहवाल अपूर्ण असून त्यांनी तातडीने पूर्तता करावी असे आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांसह विविध विभागांचे अधिकारी व सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी

आढावा बैठक ही चार दिवस आधीच नियोजित होती. तरी अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. नियोजीत बैठक असतांना तुम्ही निघून जाता हे बरोबर नाही, मंत्र्यांना समोरच प्रांताधिकारी, तहसीलदार पाहिजे, असं जर समजायला लागले तर ते काही योग्य नाही, पालकमंत्री हा पालक म्हणून असतो त्रास द्यायला नाही, हे लक्षात घ्या, अधिकार्‍यांनी आढावा बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. इकडे महत्वाची बैठक आहे, हे मंत्र्यांना सांगता आले नाही का?, प्रशासनाचे असे वागणे बरोबर नाही, आपणही अनेक वर्ष महसूल, कृषी यांसारखे महत्वाचे विभाग सांभाळले आहे. मात्र या काळात जनतेच्या मदतीसाठी प्रशासनाने काम करावे, या बाबत आपण काळजी घेतली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या