मुंबई l Mumbai
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्याने याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली गेली. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली.
शौविक चक्रवर्तीने आज मुंबईतील एनडीपीएस कोर्टात आपल्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये शौविकने त्याला लवकरात लवकर जामिन द्यावा असे म्हटले आहे. शौविकचे वकिल सतीश मानशिंदे यांनी कोर्टात जामिन अर्ज दाखल करत असे म्हटले की, नार्कोटिक्स विभागाला कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळाले नव्हते. फक्त संबंधित विधानांच्या आधारावर त्याला अटक केली गेली होती.
दरम्यान, शौविकला NCB कडून मुंबईतून येत्या 4 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर त्याचे वकिल बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता. त्याचसोबत स्पेशल कोर्टाने सुद्धा त्याचा जामिन अर्ज मंजूर केला नाही.
तसेच रिया चक्रवर्तीचा तब्बल 3 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर अखेर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. यावेळीही शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. रिया ड्रग्ज सिंडिकेटची (Drug Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला होता. दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले होते.