Tuesday, September 29, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘ड्रग्ज’च्या आड अपहरणाचा कट दडविण्याचा प्रयत्न?

Ahilyanagar : ‘ड्रग्ज’च्या आड अपहरणाचा कट दडविण्याचा प्रयत्न?

एसपींच्या ‘ड्रग्जमुक्त अहिल्यानगर’ मोहिमेला तोफखाना पोलिसांकडून हरताळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलिसांनी सावेडीतील मिस्किन मळा परिसरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना एका व्यक्तीचे अपहरण करायचे होते. मात्र, अपहरण करण्यापूर्वीच ते पोलिसांच्या ताब्यात गेले. ज्या एका आरोपीने अपहरणाचा कट रचला होता, त्यालाच ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी करण्याचा पध्दतशीर प्लॅन तोफखाना पोलिसांनी केल्याची चर्चा आहे. ज्या व्यक्तीचे अपहरण करण्यात येणार होते, त्याच्याकडून पोलिसांनी मोठे घबाड घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

अपहरणाचा कट रचणार्‍याला ड्रग्ज प्रकरणात मुख्य संशयित करून त्याचा काटा काढण्याचा प्लॅन पोलिसांच्या डोक्यातूनच आला असल्याची चर्चा असून, गुन्ह्यात या प्रकरणाचा काहीही संबंध येऊ दिला नाही, असेही बोलले जात आहे. एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्जमुक्त अहिल्यानगर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांवर कारवाया सुरू आहेत. मात्र, तोफखाना पोलिसांकडून अधीक्षक सुदर्शन यांच्या आदेशालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना तोफखाना पोलिसांनी अधीक्षक सुदर्शन यांच्या मोहिमेलाच छेद दिल्याचे दिसून येत आहे.

अंमली पदार्थमुक्त अहिल्यानगरचा नारा देत जिल्हा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू असतानाच, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या सुमारे 155 ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अधीक्षक सुदर्शन यांनी नागपूर येथे असतानाही ड्रग्जविरोधी मोहीम राबविली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात आल्यानंतरदेखील त्यांनी ड्रग्जमुक्त अहिल्यानगर करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तोफखाना पोलिसांनी केलेल्या एमडी ड्रग्ज कारवाईत मोठमोठ्या तडजोडी केल्याची बाब लपून राहिलेली नाही. याची खमंग चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.

गुन्हा एलसीबीकडे वर्ग
दरम्यान, तोफखाना पोलिसांनी एमडी ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेकांची चौकशी करून त्यांना तडजोडीतून सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदी तपासल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली आहे. एमडी ड्रग्ज प्रकरणाचा गुन्हा पुढील तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करण्यात आला आहे.

अधिकारी, अंमलदार चौकशीच्या फेर्‍यात
एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य करीत होते. त्यांना त्यांच्या मर्जीतील उपनिरीक्षक आणि अंमलदार मदत करीत होते. आता या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे. शहर विभागाचे उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांना प्राथमिक स्वरूपात चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले. जे कोणी पोलीस अधिकारी व अंमलदार दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. टिपरसे कोणत्या पध्दतीने चौकशी करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गंगाघाटावर अघोरी स्नान; नाशकातील मांत्रिक महिलेसह साथीदारांना...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आजारपण अन् कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून धुळ्यातील (Dhule) एका अल्पभूधारक मजुराच्या कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली...