Saturday, April 25, 2026
HomeनगरAhilyanagar : पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाचा पंचनामा

Ahilyanagar : पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाचा पंचनामा

पुणे ग्रामीण पोलिसांकडून गोपनीय पध्दतीने तपासणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेला अंमली पदार्थ (ड्रग्ज) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शामसुंदर विश्वनाथ गुजर याने अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील जप्त मुद्देमाल कक्षातून चोरी करून विक्री केल्याच्या संशयावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी (22 जानेवारी) सायंकाळी संबंधित मुद्देमाल कक्षाला भेट दिली. पोलीस मुख्यालयाचे मुख्य गेट बंद करून या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली होती. सदर मुद्देमाल कक्षामध्ये पंचनामा करण्यात आला असून ही कारवाई गोपनीय पध्दतीने उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासणीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चौकशी समिती मुद्देमाल कक्षाची तपासणी करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात कारवाई करत 10 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणाच्या तपासात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्त असलेला पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, गुजर याच्याकडे पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची चावी व जबाबदारी होती. त्याने या कक्षातूनच ड्रग्ज चोरी करून त्याची विक्री केल्याचा संशय पोलिसांना आहे.

सदर मुद्देमाल कक्षामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करून जप्त केलेले अंमली पदार्थ ठेवण्यात आले असून त्यापैकी अनेक मुद्देमाल अद्याप नष्ट करण्यात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी मुद्देमाल कक्षाची पाहणी केली. यावेळी अहिल्यानगर शहर पोलीसही उपस्थित होते. तपासादरम्यान पोलीस मुख्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार बंद ठेवण्यात आले होते. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणालाही आत प्रवेश देण्यात येत नव्हता. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक मुद्देमाल कक्षात पंचनामा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणानंतर अहिल्यानगर पोलिसांकडून मुद्देमाल कक्ष, तेथील जप्त मुद्देमाल तसेच सुरक्षा व्यवस्थेची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जरी गुजर याच्याकडे मुद्देमाल कक्षाची जबाबदारी असली तरी त्या ठिकाणी आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ते कार्यान्वित आहेत. तसेच 24 तास बंदोबस्तही तैनात आहे. अशा परिस्थितीत मुद्देमाल कक्षातून ड्रग्ज चोरी होऊन त्याची विक्री झाल्याचा आरोप गंभीर असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासणीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्फत या कक्षाची सखोल तपासणी करण्यात येणार आहे, असेही घार्गे यांनी सांगितले.

कलुबर्मे करणार स्वतंत्र चौकशी
अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडून मुद्देमाल कक्ष व संबंधित सुरक्षा व्यवस्थेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. चौकशीनंतर ते अधीक्षक घार्गे यांना अहवाल देणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे व 24 तास बंदोबस्त असताना जर ड्रग्ज चोरी झाली असेल तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपी गुजर याच्यावर बडतर्फीच्या दृष्टीनेही कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे घार्गे यांनी स्पष्ट केले.

मेफेड्रोन की अल्प्राझोलम’? संभ्रम कायम
पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रेसनोटमध्ये जप्त अंमली पदार्थ मेफेड्रोन (एमडी) असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षात श्रीरामपूर येथून जप्त केलेले अल्प्राझोलम ठेवण्यात आले आहे. गुजर याने मेफेड्रोन की अल्प्राझोलमची चोरी केली, याबाबतची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. बाजारभावानुसार मफेड्रोनची किंमत कोटींच्या घरात, तर अल्प्राझोलमची किंमत लाखांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : ‘हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये’, छत्रपती शिवरायांच्या...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ 'बागेश्वर बाबा' यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या...