Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमShrirampur : अंमली पदार्थ विकणार्‍याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Shrirampur : अंमली पदार्थ विकणार्‍याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपुरात सलग दुसर्‍या दिवशी एलसीबीची धडक कारवाइ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सलग दुसर्‍या दिवशी श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या एका संशयित तस्कराला अटक केली. या कारवाईत सुमारे 2 लाख 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका फरार आरोपीचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक श्रीरामपूर शहर परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मिल्लतनगर येथील सोहेल जुबेर शेख (वय 27) हा एमडी विक्रीसाठी श्रीरामपूर-संगमनेर मार्गावरील नांदूर शिवारातील अस्तगाव फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर शहर पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीदरम्यान प्लास्टिकच्या पाऊचमध्ये ठेवलेला 4.83 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला. चौकशीत हा अंमली पदार्थ बेलापूर येथील आसिफ मुनीर शेख याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली असून संबंधित आरोपी सध्या फरार आहे. या कारवाईत पोलिसांनी 96 हजार 600 रुपयांचा एमडी, 6 हजार 200 रुपये रोख, 50 हजार रुपयांचा मोबाईल आणि 1 लाख रुपयांची दुचाकी, असा एकूण 2 लाख 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रमीजराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...