Saturday, May 25, 2024
Homeनगरसंगमनेरातील दूधगंगा पतसंस्थेत 98 कोटी 57 लाखांचा गैरव्यवहार

संगमनेरातील दूधगंगा पतसंस्थेत 98 कोटी 57 लाखांचा गैरव्यवहार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या आर्थिक क्षेत्रात एकेकाळी आघाडीवर असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये प्रचंड बिघाडी झाल्याची खळबळजनक माहिती उपलब्ध झाली आहे. या पतसंस्थेमध्ये 79 कोटी 24 लाख 29 हजार 165 रुपयांचा अपहार तर 19 कोटी 32 लाख 90 हजार 730 रुपयांचे आर्थिक नुकसान अशी तब्बल 98 कोटी 57 लाख 19 हजार 895 रुपयांची गडबड झालेली आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी या संस्थेचे 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या पाच वर्षांच्या कालावधीचे फेर लेखापरीक्षण केल्यानंतर ही बाब पुढे आली आहे. दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहारामुळे तालुक्यातील सहकारी संस्थां मधील करड्या आर्थिक शिस्तीला तडा गेला आहे. काल सोमवारी ठेवीदारांनी संस्थेच्या कार्यालयासमोर चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत निषेध नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला.

- Advertisement -

दूधगंगा पतसंस्थेस झालेल्या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच विशेष लेखा परीक्षकांचा अहवालामध्ये संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर, अकाऊंटंट यांना जबाबदार धरले आहे.

दूधगंगा पतसंस्थेतील अपहार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले आहे. काल सकाळी संतप्त ठेवीदारांनी पतसंस्थेच्या प्रवेशद्वारासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. ठेवीदारांनी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे व व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांना धारेवर धरले. पतसंस्थेत पैशांचा अपहार करून तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी वाढवली आहेे. ही मालमत्ता विकून आमचे पैसे परत द्या, असे अनेेक ठेवीदारांनी अध्यक्षांना सुनावलेे. आपण 11 एकर जमीन विकणार असून ठेवीदारांपैकी कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी जरूर घ्यावी, असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

ठेवीचे पैसेे देण्यासाठी ठोस निर्णय घ्या नाहीतर आम्ही पतसंस्थेसमोर आमरण उपोषण, आंदोलन करू असा इशारा यावेळी ठेवीदारांनी दिला आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री यांची भेट घेवून त्यांच्याकडे दाद मागणार असल्याचे ठेवीदारांनी यावेळी सांगितले.

दरम्यान जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अहमदनगर यांनी दिनांक 15 जुलै 2022 च्या आदेशान्वये जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था यांना दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2016-21 या पाच वर्षांच्या कालावधीचे फेरलेखापरीक्षण विशेष लेखापरीक्षकांनी पूर्ण केले. फेर ऑडिट सुरू झाल्यानंतर प्राथमिक तपासणी मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आढळले. दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहरला पतसंस्थेचेेे अध्यक्ष, संचालक, मॅनेजर व अकाउंटंट जबाबदार असल्याचे लक्षात आले. यानंतर विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था, अहमदनगर यांनी दिनांक 7 जुलै 2023 रोजी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक अकाउंटंट यांना नोटीस बजावली आहे.

सदर नोटीसीमध्ये अपहार झालेल्या रकमेत 79 कोटी 24 लाख 29 हजार 165 रुपयांचा समावेश आहे तर गैरव्यवहार रकमेमध्ये 19 कोटी 32 लाख 90 हजार 730 रुपये रकमेचा समावेश आहे. अशी एकूण रक्कम 98 कोटी 57 लाख 19 हजार 895 रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे.

प्रत्यक्ष संस्थेस नफा नसतांना, नफा असल्याचे भासवून लाभांश वाटप करुन केलेला गैरव्यवहार, सभासदांना लाभांश वाटप करण्याऐवजी साखर वाटप करणेसाठी कमी पडलेली रक्कम दर नियंत्रण निधीस नावे टाकुन केलेला गैरव्यवहार, श्रमसाधना नागरी सहकारी पतसंस्था मर्या या संस्थेचे विलीणीकरण व्यवहाराबाबत व त्यामधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे पाच वर्षांचे फेर ऑडिट करण्यात आलेले आहे. या तपासणीमध्ये पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक यांना नोटिसा बजावल्या आहेत. काही संचालकांनी आपले म्हणणे यापूर्वीच मांडले असून उर्वरित संचालकांसाठी म्हणणे मांडण्याची मुदत आज दिनांक 18 जुलै 2023 ची देण्यात आलेली आहे. सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

आर. एफ. निकम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था अहमदनगर

- Advertisment -

ताज्या बातम्या