लासलगाव। वार्ताहर Lasalgaon
कांद्याच्या प्रश्नांवर कायम ठोस उपाययोजना करण्यासाठी मुंबई येथे या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बाजार समितीतील सर्व संबंधित घटकांची बैठक घेण्यात येणार असून, कांदा अनुदानाची थकीत रक्कमही आठवडाभरात शेतकर्यांना मिळेल, यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
कांद्याच्या मुद्यावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन थेट कांदा उत्पादक शेतकर्यांसह व्यापार्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी जलज शर्मा, लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, बाजार समिती संचालक पंढरीनाथ थोरे, डी.के. जगताप, भिमराव काळे, सुवर्णा जगताप, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्याचबरोबर देशातील कांदा देशाबाहेर गेला तर देशात कांदाटंचाई निर्माण होऊन कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून केंद्र सरकारने शेतकरी व ग्राहक हितास प्राधान्य देवून कांदा निर्यातीवर शुल्क लागू केले आहे. असे असले तरीही शेतकर्यांचे नुकसान होवू नये याकरिता नाफेड व एनसीसीएफ यांच्यामार्फत 2410 रूपये प्रति क्विंटल दराने शेतकर्यांकडून कांदा खरेदी करण्यात येत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडचे 40 कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये अजून वाढ करण्यात आली असून, आता 60 खरेदी केंद्रावर कांदा खरेदी केला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
अलीकडील चार दिवसात व्यापारी वर्गाने फक्त चार हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली. ही अतिशय गंभीर बाब आहे. निर्यात शुल्क वाढ व कांदा बाजारभावासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका समजून घेऊन यासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन सदैव तत्पर आहेत. कांदा चाळीच्या अनुदानासंदर्भात एक रकमी कांदा अनुदान शेतकर्यांच्या पदरात देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. जेणेकरून शेतकरी कायमस्वरूपी संकटातून बाहेर कसा पडेल, यासाठी लवकरात लवकर एक आठवड्यात शेतकर्यांसाठी चांगला निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
येथील बाजार समितीच्या शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवाराला महाजन यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.शनिवारी लिलाव बारापर्यंतच असतो. ना. महाजन यांच्या आगमनापूर्वीच कांदा लिलाव संपलेला होता. परंतु, उपस्थित काही शेतकर्यांनी कांद्याचा उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यात असलेली मोठी तफावत याबाबत आपले गार्हाणे त्यांच्याकडे मांडले. त्याचप्रमाणे मागेल त्याला कांदा चाळीसाठी अनुदान शासन स्तरावरून प्राप्त करून द्यावे, असेही शेतकर्यांनी यावेळी सांगितले. घसरलेल्या कांदा बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल तर नाफेडने किमान चार हजार रुपये दराने शेतकर्यांकडून कांदा खरेदी केला पाहिजे, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
यावेळी निफाडचे आमदार व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी बाजार समितीच्या वतीने महाजन यांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, माजी जि.प. सदस्य यतीन कदम, माजी सभापती व संचालक दीपक बोरस्ते, भाजप युवा मोर्चाचे बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, बाजार समितीचे संचालक व व्यापारी उपस्थित होते. कांद्याप्रमाणेच टोमॅटोच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. मोठ्या प्रमाणात बांगलादेशामध्ये टोमॅटो निर्यात केला जात होता, तो केंद्र सरकारच्या धोरणामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी मागणी शेतकर्यांनी ना. डॉ. महाजन यांच्याकडे केली.