पंचवटी | प्रतिनिधी
पंचवटी परिसरात अनेक वाहतूक बेट व दिशादर्शक कमानींवर अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावलेले असतानाही महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून डोळेझाक केली जात आहे. विनापरवानगी व फुकटातील प्रसिद्धी वाहनचालकांसाठी जिवघेणी बनत चालली आहे. उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना,आजवर महापालिकेच्या पंचवटी विभागाकडून साधी तक्रारही दाखल झालेली नाही.यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण हितसंबंध जोपासण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व विविध सणांच्या नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली पंचवटीत बॅनरबाजींची जणू स्पर्धाच सुरू आहे. यातील बहुतांश होर्डिंग वाहतुकीला अडथळा ठरणार असून यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. तर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून दिशादर्शक कमानी उभारल्या आहेत,परंतु या कमानीवरील दिशादर्शक झाकत मोठ्या प्रमाणात विनापरवानगी बॅनरबाजी केली जात आहे.
या अनधिकृत बॅनरबाजीबाबत नागरिकांकडून कारवाईची मागणी होते आहे. शहराचे हे विद्रुपीकरण पालिकेने तातडीने थांबविण्याची गरज आहे. सध्या नवरात्री आणि काही दिवसांनी दिवाळीसण आलेला आहे या सणांच्या शुभेच्छा देण्याची राजकीय नेत्यांमधील व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ही स्पर्धा नागरिकांसाठी तापदायी असल्याचे भानही कुणाला नाही.
महापालिका आयुक्त यांनी सप्टेंबर महिन्यात शहरातील सर्व अनधिकृत बॅनर, होर्डिंग काढून घेण्याबाबत जाहीर आवाहन केले होते. या आवाहनानंतर देखील जे कोणी विनापरवानगी बॅनरबाजी करेल त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका क्र. १५५/२०११ यांचे दि. ३१/१/२०१७ रोजीच्या आदेशान्वये तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम, २४४ व २४५ व महाराष्ट्र महापालिका नियम,२०२२ नुसार सर्व अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज फलक जप्त करत या जप्तीच्या कारवाई करता येणारा खर्च संबंधीतानाकडून वसूल केला जाईल व महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेंसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट १९५ नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असे सांगितले होते.
परंतु महापालिका आयुक्तांच्या या जाहीर आवाहनाला ना अनधिकृतकृत बॅनरबाजी वाल्यानी हाक दिली ना महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी. कारण राजकीय दबाव तसेच अर्थपूर्ण हितसंबंधामुळे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून स्वतः महापालिका आयुक्तांनाच या अनधिकृत बॅनरबाजी विरोधात मैदानात उतरत शहर विद्रुपीकरण थांबवावे लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
विभागीय अधिकाऱ्यांकडून पोलिसांच्या पत्राला केराची टोपली
आगामी येणारे सण लक्षात घेत राजकीय मंडळीसह विविध सामाजिक संस्था व व्यक्ती नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरात होर्डिंग, बॅनर लावतील. या बॅनरबाजीमुळे हद्दीत कायदा सुव्यवस्थाच प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय महापालिका हद्दीत होर्डिंग लावू नये. पंचवटी पोलिसांनी महापालिकेच्या पंचवटी विभागीय अधिकारी यांना ६ ऑक्टोबर २०२३ रोजी जर कोणी विनापरवानगी हद्दीत असे होर्डिंग लावलेले आढळतील तर त्याच्यावर महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे पत्र दिले आहे.
बॅनरबाजीतून गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण
पंचवटीत अनेक ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छांसह नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग लावलेले आहे. या होर्डिंगवर शुभेच्छा देणाऱ्यांपैकी अनेकांवर खुनासह अनेक गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. अश्या गुन्हेगारीवृत्तीच्या लोकांनी होर्डिंग लावत एक प्रकारे परिसरात आपले वर्चस्व दाखवण्याचा तर दुसरीकडे प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.