नाशिक । प्रतिनिधी Nashik
दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. स्व. देवकिसनजी सारडा यांच्या निधनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, महाराष्ट्रातील ख्यातनाम उद्योजक देवकिसनजी सारडा यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या रुपाने आपण एक देशाभिमानी उद्योजक गमावला आहे.
अहिल्यानगर,नाशिकसह महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. याशिवाय सहकार क्षेत्राला बळकटी देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. ‘देशदूत’, ‘सार्वमत’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचा आवाज घरोघरी पोहोचवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
या कठीण प्रसंगी आम्ही सारडा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो!-उपमुख्यमंत्री अजित पवार