Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखजाणते सुवर्णमध्य काढू शकतील?

जाणते सुवर्णमध्य काढू शकतील?

करोना काळात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन शिक्षण ही काळाची अपरिहार्य गरज आहे असे म्हणत त्याचे समर्थनही केले जाते. तथापि याबाबत युनेस्कोच्या एका अहवालात अत्यंत प्रतिकूल मते व्यक्त करण्यात आली आहेत. माध्यमांनी देखील या अहवालाची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनपासून दूर ठेवावे असा सल्लाही त्या अहवालात देण्यात आला आहे.

भारतात मोबाइलचा वापर या वर्षाअखेरपर्यंत १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. मोबाईलच्या वाढत्या वापराचे मुलांवर अनेक दुष्परिणाम संभवतात यावर मानसतज्ज्ञांचे एकमत आढळते. मुलांची आकलनक्षमता, एकाग्रता, शोधक वृत्ती कमी होऊ शकते. भावनांचे नियमन जमत नाही. त्यांना मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडू शकते. अशा अनेक परिणामांकडे हा अहवाल लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. तथापि ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरताना शिकवण्याआधीच मुलांना मोबाईल वापरण्याची परवानगीच देत आहोत. शाळा नियमित सुरु झाल्यानंतर या वापरावर मर्यादा आणायला हव्यात. मोबाईलचा अती वापर मुलांमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण करू शकतो अशी मते सुजाण शिक्षक आणि पालक व्यक्त करत होते. त्यावर युनेस्कोने शिक्कामोर्तब केले आहे. शिक्षक आणि मुलांचे भावनिक नाते असते. जे मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरते.

- Advertisement -

सहवासातून मुलांमधील कौशल्ये आणि वैगुण्य शिक्षकांच्या लक्षात येत असतात. जीवनावश्यक कौशल्यांचा विकास होतो. शिस्त, भावनिक बुद्धिमत्ता, वेळेचा सदुपयोग आणि व्यवस्थापन, आदर, कृतज्ञता, तर्कशक्ती, संघभावना, सहकार्य, अपयशाचा स्वीकार आणि त्यावर मात ही त्यापैकीची काही कौशल्ये. आयुष्य यशस्वी जगण्यात आणि सर्वांगीण विकासात यांचे महत्व जाणत्यांना वेगळे सांगायला नको. संस्कारांची आणि जीवनकौशल्याची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये करणाऱ्या शिक्षकांची जागा मोबाईल कधीतरी घेऊ शकेल का? युनेस्कोने आणखी एका गंभीर सामाजिक परिणामाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मुलांविषयीची सगळी माहिती किंवा डेटा लीक होण्याचा इशारा दिला आहे. माहितीचा गैरवापर ही जगाची डोकेदुखी आहे. त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम जग अनुभवत आहे.

मुलांचे शालेय वय संवेदनशील असते. त्यांच्याविषयीच्या माहितीचा कोणत्याही स्वरूपाचा गैरवापर मुलांचे आयुष्य प्रभावित करू शकतो. एका नाण्याला दोन बाजू असतात. त्याला हा अहवालही अपवाद नाही. मोबाईल वापराच्या बाजूने आणि विरुद्ध ममतान्तरे व्यक्त होत आहेत. विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर बंदी अनेकांना अनावश्यक किंवा गैरलागू वाटू शकेल. स्मार्टफोनचा वापर विध्यार्थ्यांच्या किती फायद्याचा ठरू शकेल याच्या समर्थनार्थ अनेक मुद्दे मांडले जाऊ शकतात. मांडले जात आहेत. मोबाईलचा योग्य वापर मुलांना शिकवला जावा, त्याच्या दुष्परिणामांविषयो जागरूकता निर्माण करावी असे मत काही जण मांडतात.

तशी क्षमता किती जणांमध्ये असू शकेल? तेव्हा अशा चर्चेला अंत नसू शकतो. ती सुरूच राहू शकते. यात जाणते आणि तज्ज्ञांची भूमिका मोलाची ठरू शकेल. या मुद्यावर सुवर्णमध्य काढला जाऊ शकेल का? असेल तर कसा? संबंधित सर्वांची भूमिका काय असू शकते? अशा अनेक मुद्यांवर ते समाजाला मार्गदर्शन करतील का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या