Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमAhilyanagar : ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात

Ahilyanagar : ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात

श्रीरामपूरच्या गुन्ह्यात 47 कोटींची फसवणूक उघड || 12 जणांवर लवकरच दोषारोपत्र

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमधील ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणाचा अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेला तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचे आर्थिक गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण केले असून, त्यामध्ये तब्बल 47 कोटी 11 लाख 37 हजार 146 रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरूध्द लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

- Advertisement -

ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील ठेवीदारांच्या सुमारे चार हजार कोटी रूपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. संस्थेचे चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळाविरूध्द बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे एकूण 112 गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूर येथील ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये अडकल्याने 29 जुलै 2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुढील तपासासाठी अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

या तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 18 संशयित आरोपी निष्पन्न केले असून त्यापैकी 12 जणांना अटक केली आहे. तसेच तीनशेपेक्षा अधिक ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करत फॉरेन्सिक ऑडिट केले. या ऑडिटमधून श्रीरामपूर प्रकरणात 47 कोटी 11 लाख 37 हजार 146 रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून आता कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि साक्षीदारांचे जबाब यांची सांगड घालत दोषारोपपत्र अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, जामखेड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात 7 ऑगस्ट 2024 रोजी 19 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हाही आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. जामखेड प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, श्रीरामपूर प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, अटक केलेल्या 12 आरोपींविरूध्द लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.

सहा जण पसार
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (48, रा. बीड), व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी (55, रा. बीड), वसंत शंकरराव सटाले (53, रा. पिंपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड), संचालक वैभव यशवंत कुलकर्णी (26, रा. बीड), कैलास काशीनाथ मोहिते (36, रा. बीड), रवींद्र मधुकर तलबे (40, रा. निर्मलनगर, सावेडी, अहिल्यानगर), आशिष पदमाकर पाटोदेकर-पाटील (33, रा. सोलापूर), आशा पदमाकर पाटोदेकर-पाटील (50, रा. सोलापूर), रघुनाथ सखराम खरसाडे (40, रा. बीड), रवींद्र श्रीरंग यादव (52, रा. बीड), दादाराव हरीदास उंदरे (55, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि अर्चना सुरेश कुटे (45, रा. बीड) यांना अटक करण्यात आली आहे. तर शिवाजी पारसकर, रेखा सटले, निर्मलसिंग चव्हाण, विठ्ठल बनकर, संग्राम चाळक आणि अमोल खेत्रे हे अद्याप पसार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये; राज्य शिक्षण...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक...