Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : तब्बल 33 शहरांमध्ये घराणेशाही जिंदाबाद!

Ahilyanagar : तब्बल 33 शहरांमध्ये घराणेशाही जिंदाबाद!

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांना संधी, दोघींना नाकारले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यात 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात राज्यात सुमारे 33 शहरांमध्ये आजी माजी लोकप्रतिनिधींच्या कुठे पत्नी, कुठे मुलगा, कुठे मुलगी, कुठे आई, कुठे बंधू, कुठे सून नशीब अजमावत होते. यात 34 शहरांमध्ये मतदारांनी घराणेशाहीला भरभरून पसंती दिली. तर काही ठिकाणी याच घराणेशाहीला नाकारले. अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले यात संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, देवळाली आणि पाथर्डीत घराणेशाहीला मतदारांनी पसंती दिली. तसेच अनेक ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीत घराणेशाहीला मतदारांनी धडा शिकविला आहे.

- Advertisement -

संगमनेर नगराध्यक्ष पदासाठी आमदारांच्या नातेवाईकांमध्येच लढत झाली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून आणि आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे यांनी दणदणीत विजय मिळविला. तर आ. अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांना पराभव स्विकारावा लागला. देवळालीत माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. श्रीरामपुरात माजी आमदार, शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष स्वर्गीय जयंतराव ससाणे यांचे सुपूत्र करण ससाणे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादीत केला. मात्र माजी मंत्री स्वर्गीय गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला.

राहात्यात माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय गाडेकर यांचे चिरंजीव डॉ. स्वाधीन गाडेकर विजयी झाले. पाथर्डीत माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे चिरंजीव अभय आव्हाड यांनी विजय मिळविला.

नंदुरबारमध्ये आमदार रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी यांनी शिंदे सेनेकडून विजय मिळविला. जामनेरात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक अगोदरच बिनविरोध निवडून आलेले होते. शिरपूरमध्ये भाजपाचे नेते तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने शिरपूर नरवाडे नगरपरिषदेची निवडणूक लवढली होती. त्यांचे चिरंजीव चिंतन पटेल यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली. गंगाखेडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे, बुलढाणा येथे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची पत्नी पूजा गायकवाड, कागलमध्ये अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा मुश्रीफ, खामगावात मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी अपर्णा फुंडकर यांनी भाजपाकडून विजय संपादित केला. यवतमाळमध्ये भाजपचे मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके यांनी, पुसदला अजितदादा गटाचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी, चंद्रपूर काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे, धामणगाव रेल्वे येथे (भाजप आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी अर्चना रोठे विजयी झाले.

चिखलदरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे अगोदरच बिनविरोध झाले होते. साकोलीत भाजपचे माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून देवश्री कापगते, दुधनी येथे शिंदे सेनेचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे, सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत माजीमंत्री, आ.अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार, पंढरपुरात आमदार भगीरथ भालके यांची पत्नी प्रणिती भालके, मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील, चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण (भाजप), हिंगोलीत शिंदे सेनेचे आमदार बांगर यांची वहिनी रेखा बांगर, अनगर येथे माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील (भाजप), अक्कलकोटला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा बंधू मिलन कल्याणशेट्टी (भाजप), पाचार्‍यात शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनिता पाटील, मुरगूड येथे शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी सुहासिनी परदेश, जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ संजय पाटील, आष्टा येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा विशाल शिंदे,अंबेजोगाईत आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा विजयी झाले.

ताज्या बातम्या

Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कुणाला? समोर आली मोठी...

0
मुंबई । Mumbai राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध पार...