जळगाव | Jalgaon
जळगाव जिल्ह्यात शनिवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी सव्वानऊच्या सुमारास अचानक जमिनीला हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रावेरसह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 9 वाजून 16 मिनिटांच्या सुमारास हा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही जाणवला असून जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सौम्य धक्के जाणवले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि आंतरराष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोनपासून सुमारे २७ किमी आणि धामनोदपासून ६९ किमी अंतरावर, जमिनीपासून केवळ १० किलोमीटर खोलीवर होता. भूगर्भातील हा धक्का उथळ असल्याने केंद्रबिंदूच्या आसपासच्या मोठ्या परिसरात याची कंपने स्पष्टपणे जाणवली.
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
या भागात जाणवले भुकंपाचे धक्के
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. अचानक जमीन हादरल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना घरातील वस्तू हलल्याचे जाणवले. अचानक जमीन हादरल्याची जाणीव होताच अनेकांनी सावधगिरी म्हणून घराबाहेर धाव घेतली आणि शेजाऱ्यांकडे तसेच परिचितांकडे फोन करून विचारपूस सुरू केली. सोशल मीडियावरही या धक्क्यांबाबत जोरदार चर्चा सुरू होती.
प्रशासनाकडून माहिती संकलन
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिक पातळीवर परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या गावांमध्ये हादरे जाणवले, त्यांची तीव्रता किती होती आणि कुठे नुकसान झाले आहे का, याची माहिती संबंधित यंत्रणांकडून संकलित केली जात आहे.




