मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केला आहे. याआधीच्या कार्यक्रमानुसार २८ नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. आता सुधारित निर्णयानुसार ही यादी १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी महापालिका प्रशासन आता ६ नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. तसेच या प्रारुप यादीवर १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना मागवून ६ जानेवारी रोजी हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ जानेवारीला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ जानेवारीला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.




