Thursday, April 16, 2026
HomeनगरED Raid : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राहत्यातील एका ‘पतसंस्थेत’ ईडीची...

ED Raid : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राहत्यातील एका ‘पतसंस्थेत’ ईडीची एन्ट्री; बोगस खात्यांद्वारे कोट्यवधींची अफरातफर?

राहता । Rahata

अशोक खरात उर्फ भोंदू बाबा याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून थेट अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राहता शहरात धडक दिली आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक राहत्यातील एका पतसंस्थेत दाखल झाले. बनावट खाती उघडून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याच्या संशयावरून ही चौकशी सुरू करण्यात आली असून, यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने राहत्यातील एका पतसंस्थेत त्यांच्या नकळत बनावट खाती उघडण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. विशेष म्हणजे, परब दाम्पत्य कधीही या पतसंस्थेत गेले नसताना २५ मे २०२१ रोजी ही खाती सुरू करण्यात आली होती. या खात्यांसाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे, स्वाक्षऱ्या आणि फोटो सर्व बनावट असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून खुद्द अशोक कुमार एकनाथ खरात याचे नाव असून, खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही खरातचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या बोगस खात्यांमधून लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. बँक स्टेटमेंटनुसार, ६६ लाख, ७२ लाख आणि ५ लाख ७१ हजार अशा मोठ्या रकमांची देवाणघेवाण या खात्यांमधून करण्यात आली आहे. नियमानुसार कोणत्याही बँकेत खाते उघडताना खातेदाराची प्रत्यक्ष उपस्थिती आणि केवायसी (KYC) पडताळणी अनिवार्य असते. मात्र, समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने कोणतीही शहानिशा न करता, परब दाम्पत्य गैरहजर असताना ही खाती कशी उघडली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या निष्काळजीपणामुळे आणि संशयास्पद व्यवहारामुळे पतसंस्थेचे मॅनेजर आणि अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशोक खरातवर यापूर्वीच लैंगिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीने टाच आणल्याने त्याचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. राहता परिसरातील आणखी एका पतसंस्थेचे नावही यापूर्वी अशाच प्रकारच्या प्रकरणात समोर आले होते. आता पतसंस्थेवर झालेल्या या कारवाईमुळे ‘भोंदू बाबा’ आणि पतसंस्थांचे लागेबांधे उघड होण्याची चिन्हे आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे आणखी किती बोगस खाती आणि कोणाकोणाचे काळे व्यवहार समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

​Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik समाजाच्या सुरक्षिततेसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या एका ‘खाकी’ वर्दीतील सेवकाचा कर्तव्यावर असतानाच मृत्यु (Death) झाला. अंबड पोलिस ठाण्यात (Ambad...