पेठ तालुक्यातून अनेक माणसे रोजगारासाठी कोरोनापूर्वी नाशिकला येत असत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या रोजगारावर बराच परिणाम झाला. ही सगळी माणसे बांधकामे, हॉटेल्स, बागकाम, फास्ट फूडची दुकाने असे मिळेल त्या ठिकाणी पडेल ते काम करतात. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात यातील बहुसंख्य लोकांना आपापल्या गावी परतावे लागले आणि तिकडेच थांबावे लागले. तथापि दोन-अडीच महिन्यानंतर राज्य सरकारने निर्बंध कमी करायला सुरुवात केली. आता केश कर्तनालयेही सुरु होणार आहेत. शहरात घरदार नसल्याने खाण्यापिण्यासाठी बाहेर अवलंबून असणारांसाठी खाद्यपदार्थांची पार्सल सेवा सुरु झाली. अशा कामातील तरुण पुन्हा नाशकात येऊन कामावर हजर झाले आहेत. खाद्यपदार्थांचे पार्सल घ्यायला येणारे ग्राहक आणि स्वतःमध्ये योग्य ते शारीरिक अंतर राखून, तोंडाला मुसके बांधून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. अनेक गावांच्या सीमा आजही बंद आहेत. सध्याच्या काळात गावातील कोणीही गावाबाहेर जाऊ नये. जे जातील त्यांनी दिवाळीपर्यंत गावी परत येऊ नये असे फतवे आसपासच्या काही गावांनी काढल्याचे बोलले जाते.
यासंदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ’देशदूत’च्या प्रतिनिधींनी काही तरुणांशी बातचीत केली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून कोरोनाच्या त्यांच्या जीवनावरील परिणामांबाबत अनेक गोष्टी उलगडल्या. रोजीरोटी सुरु राहण्यासाठी तोंडाला मुसके बांधणे, दोन माणसांमध्ये योग्य ते अंतर राखणे, हात वारंवार धुणे असे काही निर्बंध यापुढे काही काळ पाळावेच लागतील याचे भान खेडेगावातील लोकांना सुद्धा आणि विशेषतः तरुणांना याचे भान आले आहे. पालकांची आणि ज्येष्ठ ग्रामस्थांची समजूत घालून तरुण नाशिकला परतत आहेत. ’ देशदूत’ गेले काही दिवस हीच भूमिका मांडत आहे. सक्तीच्या बंदवर कायमची बंदी असावी, लोकांना सक्तीने घरात बसायला लावू नये, कोरोनासोबत जगायला सर्वानीच शिकले पाहिजे, बाजारपेठा पूर्ववत चालू राहाव्यात ही भूमिका ’देशदूत’ला विधायक व योग्य वाटते. कामासाठी परिसरातील माणसे शहरात आणि मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार राज्यात पुन्हा परतत आहेत. श्रावण महिना जवळ आला आहे. श्रावणापासून अनेक सार्वजनिक उत्सवांना आणि सणांना सुरुवात होते. दही हंडी व गोपाळकाला, गणेशेत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समन्वय समितीने घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल असे लालबागसारख्या अनेक मोठ्या मंडळांनी जाहीर केले आहे. भाविकांनी दर्शनासाठी यंदा गर्दी करू नये असे आवाहन गणेशभक्तांनाही केले आहे.
लग्नसमारंभ दासोऊळाशिवाय साधेपणाने पार होऊ लागले आहेत. अनायासे ही सामाजिक सुधारणा घडत आहे. माणसे घराबाहेर निरुद्देश पडणे टाळत आहेत. जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा तोंडाला मुसके बांधत आहेत. सामाजिक शहाणपण वाढत आहे. याचे ते दाखले आहेत. कायद्याने सर्वच गोष्टी साध्य होत नाहीत. काही ठराविक मंडळींसाठी कायदा निर्माण केला जातो. आणि त्यांचे खिसे भरले की त्याच कायद्यातील पळवाटा शोधून कायद्याच्या बडग्यातून सुटकाही करून घेतली जाते. पण समाजाचे शहाणपण वाढल्याशिवाय सामाजिक सुधारणांना गती देणे आणि कोरोनाच्या फैलावाला अटकाव करणे शक्य नाही हे जनतेलाही उमजले आहे. बंदला सुरुवातीला जनतेचा मिळालेला पाठिंबा तिसर्या व चौथ्या बंदच्या वेळी पातळ होत गेला. शासनानेही हे लक्षात घेतले. बंदचा हट्ट बाजूला सारून ’ अनलॉक’ सुरु झाले. हाच शासनाच्या सामंजस्याचा प्रतिसाद नाही का? समाजसुधारणा व्हाव्यात आणि समाज शहाणा व्हावा या साठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे काम करत आहेत. तथापि कोरोनाने सुधारणांना गती दिली हे वास्तव लक्षणीय आहे. ती गती कायम राहील, सामाजिक शहाणपण वाढीला लागेल यासाठी सरकारनेही समंजस प्रोत्साहन द्यायला हवे. महाविकास आघाडीचा कारभार लोकाभिमुख ठेवण्याचा निर्धार आघाडीतील सर्व पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सतत व्यक्त केला आहे. त्याला पूरक अशीच ही प्रोत्साहनाचे धोरण ठरेल!