Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखप्रामाणिक एकात्मतेचा सुखद आविष्कार !

प्रामाणिक एकात्मतेचा सुखद आविष्कार !

राष्ट्रीय एकात्मता हे भारतीय संस्कृतीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे असे गोडवे गाण्याची चढाओढ सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेतेमंडळींत सुरु आहे. सगळे भेदाभेद विसरून राष्ट्रीय एकात्मतेची भावना माणसांना जवळ आणते. त्यांची मने जोडते. परस्परात आपुलकीची भावना निर्माण करते. लोकशाहीच्या बळकटीकरणात महत्वाची भूमिका पार पाडते. आदी अनेक तर्‍हेने भारतीयांचे श्रेष्ठत्व जगावर ठसवण्याचे प्रयत्नही सध्या जोरावले आहेत. प्रत्यक्षात मात्र याची अनुभूती घडवणारे प्रसंग तसे दुर्मिळच.

मात्र या विशाल देशात कुठल्यातरी दुर्लक्षित कानाकोपर्‍यात प्रामाणिक एकात्मतेचा पाठपुरावा करण्याचे प्रयत्नही सामान्य समाज करताना आढळतो. तेव्हा समाजही त्यांची योग्य नोंद घेतो. कोरोनामुळे यंदा वारकर्‍यांच्या आषाढी वारीला बंदी होती. सर्व संतांच्या पादुका आणि मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरला नेऊन वारीची परंपरा टिकवण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. या सगळ्या पालख्या पंढरपूरच्या वाटेवर विसाव्यासाठी वाखरीला त्या प्रवासातील शेवटचा टप्पा घेतात. तेथे रात्रभर दिंड्यांच्या रिंगणाचा अत्यंत भव्य व आकर्षक सोहळा दशमीच्या रात्री रात्रभर साजरा होतो. त्या पालख्यांना विठुरायाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी आणि त्यांची आगवानी करण्यासाठी संत नामदेवांच्या पादुका वाखरीला जातात. पालखीत सहभागी झालेले वारकरी एकमेकांना उराउरी भेटतात. त्यानंतर सगळ्या संतांच्या पादुका पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र जातात.

- Advertisement -

यंदा संत नामदेवांच्या पादुकांही एसटीमधूनच वाखरीला नेण्यात आल्या. त्या बसचा चालक कोण असावा यासाठी दहा चालकांच्या नावाने चिट्ठ्या टाकण्यात आल्या. संत नामदेवांच्या पादुका घेऊन जाणारी एसटी चालवण्याचा मान आरिफ शेख यांना मिळाला. त्यांनी हर्षभरित चित्ताने आणि वारकर्‍याच्या भावुकतेने ही जबाबदारी पार पडली. म बा विठ्ठला, धन्य झालो म अशी भावना व्यक्त केली. काढलेल्या चिट्ठीत नेमके शेख यांचे नाव निघावे हाही त्या ठिकाणी जमलेल्या सर्वाना विठूरायाच्याच इच्छेचा भाग असावा असे वाटले. सर्वानी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याच प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक करणारे दुसरे उदाहरण उत्तरप्रदेशात घडले. देवबंद हे आशियातील 165 वर्षांपेक्षा जुने इस्लामिक शिक्षण केंद्र मानले जाते. देवबंद पंथाच्या शिक्षणकेंद्रात हिंदू धर्माच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

त्यासाठी 50 आसने राखीव आहेत. जगातील इतर धर्मांचाही अभ्यासक्रम तेथे शिकवला जातो. देवबंद पंथाचे भारतातील प्रमुख अलीम मौलाना अब्दुल हमीद नोमानी हे या अभ्यासक्रमांचे मानद प्राध्यापक आहेत. हिंदू धर्म आणि दर्शनाशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व आहे. तो अभ्यासक्रमही त्यांनीच तयार केला आहे. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन परिपक्व व्हावा या उद्देशाने सुमारे पाव शतकापूर्वी हे अभ्यासक्रम सुरु केले असे संस्था अभिमानाने सांगते. संस्थेच्या ग्रंथालयात 2 लाख पुस्तके व 1500 हुन अधिक दुर्मिळ पांडुलिपीचे दुर्मिळ नमुने आहेत. या अभ्यासक्रमातून सर्व धर्मांकडे बघण्याचा एक विशाल भूमिका तयार होते. अभ्यासकांचा दृष्टिकोन व्यापक होतो. हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या शिक्षणात अदभूत साम्य आढळते अशा भावना इतर धर्मांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या मौलाना अब्दुल मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रीय एकात्मतेची देवबंद पंथाची भावना फक्त बोलण्यापुरती नाही. सामान्यांना समाजात एकोपा हवा असतो. त्यांना कोणतेही भेदाभेद आणि जातीधर्माच्या नावावर समाजात फूट नको असते. यावर मौलानांचा ठाम विश्वास आहे. तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे. माणसांच्या छोट्या छोट्या समूहांना देशातील बहुविविधतेचा आदर आणि अभिमान आहे. प्रसंगतोत्पात ही भावना सर्वसामान्यांच्या आचरणातून व्यक्त होते. त्यांना जे कळते ते देशातील बहुसंख्याना कळत नसेल का? की, कळत असेल पण वळत नसेल? किंवा त्यांना कळूनच घ्यायचे नसेल? तथापि छोट्याश्या बीयातून वटवृक्ष निर्माण होतो.

तद्वत सामाजिक शहाणपण विकसित झालेल्या छोट्या समूहांची संख्या वाढत गेली तर समाज आपोआपच बदलेल. आणि समाजात एकात्मतेची भावना जसजशी बळकट होईल तशी भारताची जागतिक प्रतिमा आणि भारतीय एकात्मतेचे भावी दर्शन जगाला घडू शकेल. अशी आशा निर्माण करणार्‍या वरीलसारख्या घटना छोट्या किंवा नगण्य वाटत असल्या तरी माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचा आविष्कार त्यातून जाणवतो. याच उज्वल भारतीय संस्कृतीचे पावित्र्य जाणवून देणार्‍या पणत्या आहेत. देशातील बहुसंख्य समाजाने देखील सामंजस्य स्वीकारले तर ती उज्वल पहाट फार दूर असणार नाही अशी आशा करावी का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या