महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या परीक्षेचा परवा निकाल जाहीर झाला. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. राज्याचा एकूण निकाल 90 टक्के लागला. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93 टक्के आहे. म्हणजे मुलांचे प्रमाण 85 टक्क्यांपर्यंतच असावे.
यंदाच्या निकालाला दिव्यांगांच्या यशाची लखलखीत किनार लाभली आहे. राज्यातील साडेपाच हजारांपेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी तर्हेतर्हेच्या प्रतिकूलतेवर मात करून बारावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्यांच्या आयुष्यातील एका खडतर आव्हानाचा सामना करून ते उत्तीर्ण झाले आहेत. दृष्टिहीनता, सेरेब्रल पाल्सी, आत्ममग्नता, बहुविकलांगता, अवयवांच्या विकृती अशा अनेक शारीरिक उणिवांनी या विद्दयार्थ्यांचे आयुष्य काहीसे अवघड असते.
सामान्यतः त्यांचे पालकही परिस्थितीपुढे हतबल होतात. सतत चिंताग्रस्त असतात. अशा सर्व पालकांना हायसे वाटावे असे हे त्यांच्या दिव्यांग अपत्यांचे प्रेरणादायक यश आहे. सर्वच दिव्यांग मुलांच्या अडचणी अनेकदा पालकांच्याही सहज लक्षात येत नाहीत. एकदा ते दिव्यंगत्व निश्चित झाले की त्यांना वाढवताना आवश्यक ती विशेष माहिती पालकांना करून घ्यावी लागते. तरीही दिव्यांग अपत्य वाढवणे हेच पालकांपुढही मोठे आव्हान असते. अपत्याची दिव्यांगता वेळेत लक्षात आली तर इलाज लवकर सुरु करता येतात. तथापि असे किती अपत्यांच्या बाबतीत घडत असेल?
अपत्याचे दिव्यांगत्व स्वीकारण्यासही काही काळ जावा लागतो. लक्षातही आले तरी आपले अपत्य दिव्यांग आहे हेच लवकर स्वीकारले जात नाही. आपल्याच वाट्याला हे का आले? असा प्रश्न अनेक पालकांना त्याकाळात सतावत राहतो. नशिबाला दोष देऊन ते वास्तव स्वीकारले जाते. दिव्यांग मुलांसाठी काम करणार्या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती बदलत आहे. काही घरातील अनुकूल आर्थिक परिस्थिती दिव्यांग अपत्यांच्या विकासाला उपयुक्त ठरते. पण सर्वच दिव्यांगांच्या वाट्याला हे भाग्य नसते. साधारण परिस्थितीतील कुटुंबात दिव्यांग अपत्य हे पालकांना सुद्धा ओझ्यासारखे वाटते. काही पालकांच्या मनात अपराधी भावना आढळते. पण विपरीत परिस्थितीपुढे त्यांचाही नाईलाज होत असावा. दिव्यांग मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे जगणे किती अवघड असते. नुकत्याच निवर्तलेल्या एक कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी निला सत्यनारायण या विदुषीने दिव्यांग अपत्य वाढवण्यातील त्यांचे अनुभव डायरीत लिहून ठेवले आहेत.
राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून त्या निवृत्त झाल्या. ‘घरात एक मतिमंद मुलगा आहे. आजूबाजूला काय चालले आहे, का चालले आहे हे त्याला कळत नाही. त्याला रोज फिरायला न्यावे लागते. ती त्याची गरज आहे. पण हे त्याला समजावणे कठीण जाते. आपण मित्रांना फोन करतो. एकमेकांशी बोलतो. पण दिव्यांग बालकांनी काय करावे? त्यांची घुसमटसुद्धा लवकर लक्षात येत नाही.’ दिव्यांगांच्या पालकांची हतबलता त्यांनी वरील शब्दात व्यक्त केली आहे. असे असूनही हजारो विशेष बालकांनी बारावीच्या परीक्षेत मिळवलेले झळझळीत यश पालकांनाही दिलासा देणारे ठरावे. अशा बालकांना शिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद वाढेल.
सर्वच कुटुंबाच्या दृष्टीने आशेचा नवा किरण दाखवणारी ही घटना ठरावी. देशात सुबत्ता वाढली. शिक्षण वाढले. तसतसा दिव्यांग अपत्यांच्या बाबतीतही पालकांचा दृष्टिकोन काहीसा उदार झाला आहे. चार-पाच दशकापूर्वी परिस्थितीची एवढी अनुकूलता नव्हती. त्यादृष्टीने यापुढील काळात दिव्यांग बालके चांगले शिक्षण घेऊन आपल्या निर्वाहाचे साधन स्वतः मिळवू शकतील अशी आशादायक किरणे यंदाच्या निकालातील हजारो दिव्यांगांच्या यशाने क्षितिजावर दिसत आहेत.