अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिक्षण विभागातील बोगस शालार्थ प्रकरणात कोणतीही चौकशी न करता अधिकारी व कर्मचार्यांना अपमानास्पद अटक होत असल्याबद्दल शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने निषेध करत शुक्रवार (दि.2) एक दिवसाची सामूहिक रजा आंदोलन केले. तसेच सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास 8 ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बोगस शालार्थ प्रकरणात सुरू असलेल्या कारवाई विरोधात सध्या राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना नेवाशाच्या गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष साईलता सामलेटी, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संजयकुमार सरोदे, मिना शिवगुंडे, तृप्ती कोलते, हेमंत साळुंखे, महावीर धोदाड, सुरेश ढवळे, अभयकुमार वाव्हळ, भीमसेन पवार आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
शुक्रवारी जिल्ह्यात करण्यात आलेल्या एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलनात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, अधीक्षक (गट ब), विस्तार अधिकारी आदी पदांवरील अधिकारी सहभागी होते. दरम्यान, आता 8 तारखेपासून शिक्षण विभागातील अधिकारी बेमुदत सामुहिक आंदोलन छेडणार आहे. याबाबत अधिकार्यांच्या संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात ज्यांनी बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी संघटनेचीही मागणी आहे. परंतु या प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिक काम करणार्या अधिकार्यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकार्यांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी तणावाखाली काम करत आहेत.
शिक्षण विभागातील राजपत्रित अधिकारी गुन्हेगार नसून, त्यांच्या कामात त्रुटी, चुका होऊ शकतात. त्यासाठी विभागांतर्गत चौकशीची व कारवाईची व्यवस्था आहे. तथापि शासनाची परवानगी नसताना अटकसत्र सुरू आहे. त्यामुळे एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची हमी शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत शिक्षक-शिक्षकेतर वेतन देयकावर प्रतिस्वाक्षरी करणार नाही, अतिरिक्त व्हिसी, सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त कामाचा ताण कमी करा आदी मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाले नाही तर 8 ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. याद्वारे बोगस शिक्षक भरती करण्यात आली. त्याची चौकशी राज्य सरकारने सुरू केली आहे. तसेच गुन्हाही दाखल झालेला आहे. आता अटकसत्र सुरू झाल्याने शिक्षण विभागातील अधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.





