अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून साक्षर केले जाणार आहे. यासाठी उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी गावागावांत निरक्षरांचे उल्हास अॅपवर नाव नोंदवायचे असून या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी राबवण्यात येणार्या दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेसोबत आता त्या-त्या गावातील निरक्षर यांना शोधण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. यामुळे यंदा गुरूजींना शाळेसाठी विद्यार्थ्यांसोबत निरक्षरांना शोधण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
असाक्षर व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रकाश उजाडावा, यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. असाक्षरांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण आदी बाबींचा विकास करण्यासाठी कौशल्य विकसित केले जाणार आहे. यामाध्यमातून निरक्षरांना साक्षर केले जाणार आहे. उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना साक्षर करणे आहे. नवसाक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. जिल्ह्यात साक्षरतेची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गजेचे आहे. निरक्षर नागरिकांना साक्षर बनवून त्यांचे सक्षमीकरण होणे महत्वाचे आहे. राज्य शासन अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहे. याचाच हा एक भाग आहे. विशेष म्हणजे, मार्च 2025 मध्ये निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा निकालही लागला आहे.
प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित केली जाणार आहेत. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य, केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित विभागाच्या साहाय्याने केली जात आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
रम्यान, नगर जिल्ह्यात असाक्षर असणार्या 32 हजार 20 नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्टे देण्यात आलेले आहे. निरक्षरांसाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्या आधी म्हणजे 15 जूनपूर्वी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. दरवर्षी जिल्ह्यात पहिले तर आठवीपर्यंतच्या सर्व इयत्तेत दाखल होणार्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना दाखल पात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा या सर्वेक्षणासोबत निरक्षर असणार्या व्यक्तीसाठी शोध मोहिम राबवण्यासाठी त्यांना साक्षर करण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागात (योजना) यांच्यावतीने सांगण्यात आले.