Wednesday, July 24, 2024
Homeब्लॉगमुलं हाच आरसा..

मुलं हाच आरसा..

खरेतर आपला जीवन प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा तो साराच प्रवास सुयोग्य वाटेवरचा असतो असे नाही. जीवनात मानवाकडून माणूसंपणाच्या प्रवासासाठी तत्वे आणि मूल्ये यांचा विचार महत्वाचा ठरतो. त्या दिशेने प्रवास करतांना आपणाला अनेकदा तडजोडी कराव्या लागतात. किंबहूना या प्रवासात आपण जे बोलतो आणि प्रत्यक्ष कृती करतो यात अंतर असू शकते.

- Advertisement -

अऩेकदा प्रामाणिकपणे आणि सत्याच्या दृष्टीने आपला साराच प्रवास सुरू असतो असे काही नाही. माणसं मोठी झाली म्हणजे काय घडते? तर त्यांच्या प्रत्येक कृतीत हितसंबंध विकसित होण्याचा प्रयत्न होत असतो. आपल्या कृतीला सत्याचा स्पर्श कमी होण्याचा प्रयत्न केला जातो. आपण समोरच्या व्यक्तीच्या कृतीकडे निरपेक्षतेने पाहाण्याचा विचार हरवून बसतो. एखादी कृती एखादया व्यक्तिने केली असेल आणि त्यावरच ती चांगली वाईट ठरणार असेल तर त्यात सत्याचा अंश नाही. सत्य हे व्यक्ती सापेक्ष असू शकत नाही. अर्थात कोणताही मूल्यांचा विचार व्यक्ती परत्वे करणे चूक असते. कोणतीही कृती ही सत्याच्या व नैतिकतेच्या तत्व मूल्यांवरती वाईट अथवा चांगलीच ठरायला हवी. एखादी कृती ही सर्वांसाठीच चुकीची ठरायला हवी. मात्र ती चांगली अथवा वाईट ती कोणी केली त्यावर अवंलबून असणार असून चालणार नाही. त्यामुळे त्यातून सत्यता अधोरेखित होत नाही.

आपण मुलांना गृहित का धरतो?

जीवनाच्या यशासाठी आपल्याला तत्वांचा आणि विचारांचा आरसा हवा असतो. त्या आरशामुळे माणसांच्या जीवनाला योग्य वाटेने घेऊन जाणे शक्य होते. आरशा समोर कोणाही उभे राहिले तर आरसा समोरचे व्यक्तीमत्व जसे आहे तसेच त्याचे दर्शन घडवत असतो. कोणी गबाळे असेल तर गबाळे दिसणार आणि कोणी उत्तम असेल तर उत्तम दिसणार. आरशासोबत व्यक्तीनिष्ठता येत नाही. कारण त्या आरशाला तुमच्याकडून काहीच नको असते. निरपेक्ष वृत्तीने तुम्ही जगू लागला की सत्याचा प्रवास सुरू होतो. वर्तमानात माणसं सत्यापासून दूर जातात याचे कारण आपल्याला काहीतरी हवे असते. स्वार्थाचा विचार आला, की आपण सत्याची भाषा गमावून बसतो. सत्याचा प्रवास थांबवा की स्वाभिमान, सत्व आणि तत्व हे कालबाहय ठरण्याचा धोका असतो. सत्याला उंची असते. त्यामुळे त्या वाटेने चालणा-याला देखील ती उंची प्राप्त करता येते. अन्यथा बाकी आपल्या अवतीभोवती दिसणारे अनेक गोष्टी म्हणजे लहान माणंसाच्या उंच सावल्या.

आरसा फक्त माणसांचे स्वरूप दर्शित करेल. मात्र व्यक्तीच्या वागण्याचे वास्तव दर्शऩ घडविणारा आरसा कोठे असतो? आपले वागणे खरचं योग्य दिशेचा प्रवास आहे का? आपण बोलतो तसे वागतो का? गांधीजींच्या मते आपला आरसा आपले अंतरमन असते. आपला आतला आवाज आपल्याला सतत काही सांगू पाहात असतो. आपण त्याचे किती ऐकतो हाही प्रश्न आहे. मात्र तरी सुध्दा आपल्याला आरशासारखे स्पष्ट सागंणारे कोणीतरी असतेच. आपण त्याचा किती उपयोग स्वतःच्या उन्नती करीता करतो आणि त्याला किती स्वातंत्र्य देतो याला अधिक महत्व आहे. अर्थात आपण जेव्हा चुकीच्या दिशेचा प्रवास करतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे सांगणारे कोण असते तर आपल्या घरातील बालक. मात्र मुलांमध्ये आपला दोष काढणे हा भाव नसतो. ते आरशासारखे प्रामाणिक असतात. त्यांना स्वार्थाचा स्पर्श झालेला नसतो. त्यांना कोणाकडूनही अपेक्षा असल्या तरी त्यासाठी स्वतःशी अप्रामाणिक राहावे असे वाटत नाही. त्यांना समोर जे दिसते तेच ते सांगतात. मुळतः त्यांच्यात कोणताच स्वार्थाचा विचार असत नाही.

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

एकदा घरात बाबा असतांना देखील शेजारच्यांने विचारले, की “अहो, सोहमचे बाबा आहेत का घरात?” तर आईने सांगितले “ते बाहेर गेलेले आहेत. ”खरेतर बाबा घरात होते. मात्र नाही असे सांगितल्यावर घरातील लहान बालक आईला म्हणाले“ बाबा घरात आहे ना , मग खोटे का सांगितले? बाबा आणि तू तर नेहमीच सांगत असते… नेहमी खरे बोलावे आणि तुच खोटे बोलतेस?” आता हा सवाल ऐकून त्या मातापित्यांना काय बर प्रश्न पडला असेल. आई बाबां निश्चित खजील झाले, पण करणार काय? मुलं निर्मळ मनाची असतात. त्यांच्या मनात कुठलाच भाव नसतो. मान, अपमान या भावना देखील नसतात. एकदा एका मित्राकडे सहज गप्पा मारण्यासाठी बोलविले होते म्हणून गेलो होतो. सहजतेने गप्पा सुरू होत्या. तेवढयात त्यांची मुलगी म्हणाली “आई, आपल्याला आज दुस-या काकांकडे जेवायला जायचे आहे ना?” हा प्रश्न ऐकून आई म्हणाली “बाळा, आजचा बेत रदद केला आहे.” तर मुलगी म्हणाली “का ग ? अग त्या दिवशी आपल्याला त्यांनी भेटून जेवणाला बोलविले होते मग आपण जायला हवे ना?” “अग हो पण त्यांनी आज काही आपल्याला कळविले नाही. मग आपण कसे जाणार?” आईनेच तीला प्रति सवाल केला. हे ऐकूण म्हणाली, “अगं त्यात काय एवढे काकांना फोन कर की, तुम्ही आम्हाला जेवायला बोलविले होते ना! मग आम्ही येतो..” हे तीचे बोल ऐकल्यावर आईचा चेहरा पडल्यासारखा झाला.

खरंतर त्या मुलींची भावना कितीतरी निर्मळ होती. त्यात काय एवढे त्यांना आठवण करून दे इतकेच ना! किती सहज आणि निर्मळतेने ती बोलत होती.. पण त्या मुलीचे बोलणे ऐकूण आईला खजील झाले. मग मीच म्हणालो, हे बघा वहिनी लहान मुलांच्या मनात निर्मळता असते. त्यांच्या मनात कोणताच भाव असत नाही. ती सहजता आपल्या अंतकरणात नसते. त्यामुळे आपल्याला वाईट वाटते पण आपण मुलांना समजून घ्यायला हवे. आपण त्यांना वाचत जायला हवे असते इतकेच. मुले म्हणजे आपले गुरू असतात. ते जे जे आपल्याशी बोलतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा गंभीर विचार करायला हवा इतकेच. आपणाला जीवनात आनंद मिळवायचे असेल तर त्यांच्या पाऊलवाटेने आणि त्यांच्या हदयाच्या भावनेच्या शुध्दतेने चालत जायला हवे.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

मुलांना निसर्गतः एक शहाणपण लाभलेले असते. त्यांच्या अंतकरणात राग, लोभ, मद, मत्सर, अंहकार असे काहीच नसते. आपल्याला आईने काही खायला दिले तरी ते मुले अगदी शेजारच्या मुलाला देखील देतात. मग ते कुंटुब आपल्याशी बोलत नसले तरी, शत्रूवर देखील प्रेम करायला हवे इतकी उदारता त्याच्या अंतकरणात सामावलेली असते. त्याला अवतीभोवती फक्त माणसं आणि प्रेम इतकेच माहित असते. रूसो म्हणाले तसे “माणूसं जन्मजात चांगलाच असतो..” पण त्याला जो परीसर मिळतो त्यातून तो अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे वर्तमानात आपण त्या गोष्टींचा विचार करायला हवा. मुलांवरती चांगले संस्कार करायचे म्हणून आपण चांगले काही सांगत जातो. सुविचाराचा पाढा वाचतो, बोधकथा सांगत जातो. दूरदर्शनवरील चांगल्या मालिका दाखवितो. मुले ते सर्व पाहातात, ऐकतात मात्र त्यांना ते ऐकलेले, पाहिलेले व प्रत्यक्ष भोवताल मधील जगणे यात अंतर दिसते तेव्हा मात्र मुलं विचार करतात आणि बोलू लागतात. तुम्ही सांगितले ते खरे की आम्ही पाहातो ते खरे. त्यामुळे मुलांचे प्रश्न नेमके असतात. त्या प्रश्नामुळे मोठयांची गोची होते. आपण काय करावे हेच कळत नाही. त्यामुळे एकवेळ आपण समाजाला फसवू शकतो, मोठयांना पसवू शकतो.. मात्र मुलांना फसविता येणे अशक्य आहे. मोठयांना फसविले तर ते अधिकाराची परीभाषा म्हणून ते मान्य करतील आणि काही बोलणार नाही, कदाचित मोठयांच्या हाती आपले हित दडलेले आहे म्हणून बोलणार नाहीत. आपण जेव्हा स्वार्थ पाहातो तेव्हा आपल्याला सत्यापासून दूर जावेच लागते.

मात्र मुलांना स्वार्थ, हित असे काहीच कळत नाही. त्यामुळे आपण मुलांना कधीच फसवू शकत नाही. वर्गात अभ्यास कर, वाचन कर असे शिक्षक सांगत असतील आणि ते शिक्षकच जर कधी पुस्तके वाचतांना दिसत नसतील, अभ्यास करत नसतील तर विद्यार्थी अभ्यासात स्वतःला कसे गुंतवून घेणार? हा प्रश्न आहे. मुले सतत मोठयांना वाचत असतात. ते आपल्याला जाणत असतात. ते निरिक्षण करीत असतात. प्रत्येक क्षणी आपले वर्तन आणि प्रतिसाद समजावून घेत असतात. खरेतर मुले ऐकून फार कमी शिकतात. ते अधिकाधिक शिकतात निरिक्षणातून. त्यामुळे अवघ्या जगाला मोठी माणसं मूर्ख बवनत असली तरी छोटयांना मूर्ख नाही बनवू शकत. तुम्ही घरातील इतर मोठया सदस्यांपासून एखादी गोष्ट लपवून ठेऊ शकतो पण. मुलांपासून ती लपविणे फारच कठिण आहे. खरंतर मुलांपासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही.

घर हीच शाळा…

गिजूभाई म्हणतात त्या प्रमाणे लहान मुले हे सर्वव्यापी असतात. त्यांना सर्व काही माहित असते. त्यांचा सर्वत्र वावर असतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये ते देवत्व पाहातात. त्यांचे मोठयांनी भक्त व्हावे. त्याच बरोबर मोठयांनी आपली भक्ती स्थिर ठेवावी. तीच यशाची गुरूकिल्ली आहे. त्यांनी म्हटले आहे, की

तुम्ही जगाला फसवू शकता, पण मुलाला फसवू शकत नाही.

तुम्ही जगाला मूर्ख बनवू शकता पण मुलाला मूर्ख बनवू शकत नाही.

सामान्य माणसांपासून तुम्ही गोष्टी लपवून ठेवू शकता,

पण मुलापासून तुम्हाला काहीच लपवता येत नाही.

त्यांना सर्व काही माहित असते, ते सर्वत्र असतात

ते सर्व व्यापी असतात.

या देवरुपी मुलांचे भक्त व्हा.

तुमची भक्ती स्थिर असूद्या.

हीच खरी यशाची गुरुकिल्ली..

लहान मुलांकडे आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आरसा म्हणून पाहात राहिलो तर आपल्यात निश्चित सुधारणा झालेले अनुभवता येईल.गरज आहे त्यांना आणि त्यांच्या विचारांना जाणून घेण्याची.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या