Tuesday, May 21, 2024
Homeब्लॉगमाझे काम इतुकेच आहे...

माझे काम इतुकेच आहे…

समाज उन्नतीसाठी शिक्षक ज्ञानसंपन्न हवा असं सातत्याने बोलले जाते. शिक्षक ज्ञानसंपन्न असेल तरच पुढची पिढी अधिक संपन्न आस्तित्वात येईल. शिक्षक ज्ञानसंपन्न नसतील तर भविष्य अंधाराच्या खाईत लोटले जाण्याचा धोका आहे असा आपला सर्वांचा समज आहे. समाज व राष्ट्र ज्ञानसंपन्न करण्याकरीता ज्ञानसंपन्न, विदवान शिक्षक हवेत असा आपला समज आहे. विद्यार्थ्याचे जीवन प्रकाशाच्यावाटेने घेऊन जाण्याकरता शिक्षक खरचं ज्ञानसंपन्न असायला हवेत का? शिक्षण ज्ञानसंपन्न असेल तरच विद्यार्थी ज्ञानसंपन्नतेची वाट चालतील.

आडात असेल तर पोह-यात येईल अशी आपली धारणा आहे. ही धारणा खरचं खरी आहे का? मुलांचे भविष्य त्यांच्या अनुभवात आणि साधनेत आहे की शिक्षकाच्या विद्वतेत? असं असेल तर पूर्वी शाळांमध्ये ज्युनिअर पी.टी.सी, इयत्ता सातवी उत्तीर्ण असलेले शिक्षक होते. ती मंडळी फार हुशार होती असेही नाही. त्यावेळी शिक्षक कमी शिकलेले होते आणि तेच विद्यार्थ्यांना शिकवत होते.त्यांच्याव्दारे शिकलेले विद्यार्थी अत्यंत उच्च विद्या विभूषित झालेले दिसून येतात. त्यातील अनेकानी आपल्या नवनव्या वाटा शोधत यशाचे शिखर गाठले आहे. शिक्षक कमी शिकलेले असूनही विद्यार्थी उच्च शिक्षित झाले. शिक्षक अधिक शिकलेला असेल तरच विद्यार्थी शिकतात, तरच विद्यार्थी हुशार होतात हा समज काही खरा नाही. शिक्षक हा ज्ञानसंपन्न असण्यापेक्षाही गरज आहे ती ज्ञानाची ओढ असलेल्या मानसिकतेची. शिक्षकांने विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची जिज्ञासा निर्माण करण्यासाठी वाट चालण्याची.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना ज्ञानाची वाट दाखविणा-या वाटाडयाची भूमिका शिक्षकांने जोपासली तर विद्यार्थ्यांच्या वाटा ज्ञान प्रकाशाने उजळून निघतात. विनोबा सांगतात की, अनेकदा लोकांना शिक्षक म्हणजे विहीर आणि विद्यार्थी म्हणजे बादली आहे असे वाटत असते. पण आपण जे मानतो ते काही खरे नाही. शिक्षक म्हणजे काही ज्ञानाची विहीर नाही. मुळात जगात ज्ञानाची विहीर आस्तित्वात आहे. विद्यार्थी त्या ज्ञानाच्या विहिरीपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाला य़शाची किनार लाभत नाही. विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न आणि माणूस घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षकांने ज्ञानाच्या विहिरीत डुंबण्यासाठी फक्त दोर बनण्याची गरज आहे. कोणताही दोर बादलीला विहिरीतील पाण्यापर्यंत पोहचवत असतो. त्याप्रमाणे शिक्षक दोर बनला तर ज्ञानाच्या खोल विहीरीपर्यंत असलेल्या ज्ञानमय पाण्यापर्यंत विद्यार्थ्याला पोहचवता येईल. त्यामुळे शिक्षक ज्ञानसंपन्न असण्यापेक्षाही ज्ञानापर्यंत पोहचविणारा असायला हवा.

विद्यार्थ्यांना ख-या ज्ञानाचा शोध लागणे. ख-या ज्ञानाची ओळख होणे महत्वाचे आहे. त्या ज्ञानापर्यंत पोहचण्यासाठी शिक्षकांने केवळ ज्ञानदूत बनण्याची गरज आहे. शिक्षक हा ज्ञानदूतच असू शकतो. तो ज्ञानसंपन्न असण्याची शक्यता फार कमी आहे. जगात खरेतर इतके विषय आहेत की,त्या सर्व विषयात एखादी व्यक्ती ज्ञान संपन्न असण्याची शक्यता अजिबात नाही. मग शिक्षकाला तो विषय ज्ञात नाही म्हणजे विद्यार्थी त्या ज्ञानाच्या वाटेने जाणार नाही असं होण्याची शक्यता नाही. विद्यार्थ्यांच्या मध्ये मुळताच ज्ञानाची ओढ असते. पण त्या ज्ञानाच्या दिशेचा प्रवास योग्य दिशेने होण्यासाठी फक्त शिक्षकांची गरज आहे. या करीता शिक्षकांना केवळ ज्ञानाचा परीचय असण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्याला ज्ञानाची ओढ असेल तर शिक्षक त्याला योग्य दिशेने घेऊन जाण्याची शक्यता अधिक आहे.

ज्ञानरचनावादी तत्वांचा विचार करता कोणीही व्यक्ती कोणाला शिकू शकत नाही. कोणी तरी शिकवते म्हणून विद्यार्थी शिकतो हेही खरे नाही.प्रत्येकजन स्वतःच शिकत असतो.शिक्षक हा तर केवळ निमित्त आहे.त्यामुळे विनोबा म्हणतात त्याप्रमाणे आणि रचनावादी तत्वज्ञानाचा विचार करता शिक्षकांने केवळ दोर बनण्याची गरज आहे.भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दूल कलाम यांना आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात अय्यर नावाचे गुरूजी आय़ुष्यात आले.त्यांनी या मुलाच्या मनात ज्ञानाची प्रेरणा निर्माण केली.त्या प्रेरणेत एरोनॉटीक इंजिनिअर होण्याची स्वप्नांची पेरणी होती. त्यासाठीच्या ज्ञानाचा प्रवास का करायवया आहे? कसा करायचा आहे ही वाट त्यांनी दाखविली.त्यामुळे कलामाना ज्ञानात डुंबता आले. शिक्षक फक्त ज्ञानाच्या विहीरीतील पाण्यापर्यंत घेऊन जाण्याचे काम करत असतो.मात्र त्यासाठीचे प्रयत्न विद्यार्थ्यांनाच करावे लागतात.विद्यार्थी स्वतःहून डुंबला नाही तर त्याचे जीवन ज्ञानमय होण्याची शक्यता नसते.

शिक्षकांनी ज्ञानापर्यंत पोहचविण्यासाठीच्या वाटा जाणून घेण्याची गरज असते इतकेच. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान असतेच फक्त त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न होण्याची गरज असते.विनोबा म्हणतात की, मातीत मडके असते.मात्र कोणी आपल्याला माती दाखवली आणि म्हटले की यात कोठे मडके आहे..? तर आपण निरूत्तर होऊ..कारण मातीत मडके दिसत नाही.मात्र मडक्यात आहे काय असा प्रश्न विचारला तर माती शिवाय दुसरे कुठे काय आहे ? मातीत मडक्याचे आस्तित्व आहे ते दाखविण्यासाठी कुंभाराची गरज असते. मातीत मडके लपलेले असतेच फक्त कुंभार केवळ निमित्त असतो.त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्ञान असतेच..ते फक्त प्रकटीकरणाला शिक्षक मदत करत असतो.शिक्षक कोणालाही ज्ञान देत नाही.त्यांने कोणाला ज्ञान दिले म्हणून कोणी ज्ञानसंपन्न होत नाही.

विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेल्या ज्ञानासाठी शिक्षक केवळ निमित्त असतो. त्यामुळे शिक्षकांने स्वतःच्या कर्माचा विचार करताना ज्ञाना पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षकाचे काम आपण जे मानतो आणि समजतो ते त्याचे काम नाही तर विनोबा म्हणतात की, शिक्षकाचे काम तर अत्यंत मर्यादित आहेत.मात्र त्या मर्यांदाचा विचार करत काहीच करण्याची गरज नाही असे होता कामा नये.शिक्षकाला विद्यार्थ्याला ज्ञानापर्यंत पोहचण्यासाठीच्या वाटा स्वतः निर्माण कराव्या लागतील.त्या तर त्याला स्वतःच निर्माण कराव्या लागतील.त्या वाटा किती चिंतन पूर्वक तयार करतो हे महत्वाचे असणार आहे.त्या वाटा निर्माण करण्यात शिक्षकाला यश मिळाले तर विद्यार्थ्यांचे आयुष्य निश्चित यशाचे शिखर गाठणे घडेल. समाजाला शिक्षणाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा देखील पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही.असे काही घडले तर शिक्षकांचा समाज मनातील आदरही वृंध्दीगत झालेला आपणास अनुभवता येईल.

शिक्षणाचा अर्थच सांगताना विचारवंत सांगतात की, विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणे हेच शिक्षकांचे काम आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मस्तकी वरून काही लादू शकत नाही. त्यांने कितीही लादले तरी विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रतिबिबींत होण्याची शक्यता नाही.विद्यार्थ्यांच्या मध्ये जे प्रतिबिंबीत होते ते केवळ त्याच्या आत जे दडलेले आहे आणि बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न झाले तेवढेच प्रतिबिंबीत होईल. शिक्षक त्या अर्थाने केवळ प्रगटीकरणास मदत करू शकतो. प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे.त्या भिन्नतेचा विचार करता शिक्षकांने प्रत्येकासाठी भिन्न वाटांची निवड करण्यास मदत करण्याची गरज असते.त्यामुळे शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी जाणता येणे महत्वाचे असते इतकेच.ते जाणणे ,त्याच्या क्षमता,कल,अभिरूचीनुसार वाटांची निर्मिती करणे महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.

शिक्षक हा एखाद्या विषयात पारंगत असतो.तो तो विषय अधिक समृध्द् पणे शिकवतो..पण याचा अर्थ सारेच विद्यार्थी तो विषय शिकतात आणि त्याच दिशेचा प्रवास करतात असे घडत नाही. एकाच शिक्षकाने वर्गातील तीस विद्यार्थ्यांना चांगले शिकवले असले तरी सर्वांना समान मार्क पडत नाही. शिक्षकाने शिकवलेले सर्वांना भावत नाही.याचे कारण मुलांच्या मस्तकात असलेला विचार,त्याच्यात सामावलेली ज्ञानाला दिशा देण्यासाठी शिक्षकाने दिलेले अध्ययन अनुभव आणि शिक्षकांने निर्माण केलेली वाट विद्यार्थ्याला भावनारी नसेल.त्यामुळे एकाच शिक्षकाचे सर्व विद्यार्थी एका दिशेचा प्रवास करत नाही. कारण प्रत्येकात साठवलेले ज्ञान हे वेगवेगळ्या विषयाचे असते. विद्यार्थ्याला ज्ञानाची वाट दाखविण्याकरीता फक्त योग्य दिशेने जाण्याची दिशा शिक्षकाने दाखवली तरी मुले शिकत जाते. त्यामुळे शिक्षक ज्ञानसंपन्न असेल तरच मुले हुशार होतात यापेक्षा त्याला शिकण्यासाठी शिक्षक वातावरण कसा निर्माण करतो हे महत्वाचे आहे.शिकवणे म्हणजे वर्गात पाठ पूर्ण करणे नव्हे तर त्या पाठातील आशय विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी शिक्षकाने वातावरण निर्माण करणे असते.असे वातावरण निर्माण करण्यात शिक्षकाला यश मिळाले तर अध्यापन य़शस्वी झाले असे म्हणता येईल.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण विषयक अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या