Sunday, June 23, 2024
Homeब्लॉगशिक्षण कोण देते कोण घेते?

शिक्षण कोण देते कोण घेते?

शिक्षण प्रक्रियेत शिकणे आणि शिकवणे अशा दोन शब्दांचे सातत्याने उपयोजन करण्यात येते. शिकवणे हा शब्द शिक्षण प्रक्रियेत अपेक्षित नाही. शिक्षणात शिकणे हाच शब्द अधिक महत्वाचा आहे.शिकणे हिच अपेक्षित प्रक्रिया आहे.ज्ञानरचनावादी तत्वज्ञानानुसार कोणी कोणाला शिकू शकत नाही. कोणी कोणाला ज्ञान देऊ शकत नाही आणि कोणी ज्ञान देते म्हणून कोणी शिकत नाही. प्रत्येक जन स्वतःच शिकत असतो. शिकण्याची प्रक्रिया ही स्वतःच्या गती,अभिरूची आणि कल यावर अवलंबून असते.

- Advertisement -

शिक्षणाची प्रक्रिया दुहेरी असली तरी ती एका अर्थाने एकेरीच असते. शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षक एकाच वेळी एकमेकाच्या मदतीने शिकत असतात. शिक्षणात जेव्हा कोणी तरी शिकवते आणि कोणी शिकते आहे तेव्हा एकाच्या अहंकाराची वृध्दी होते आणि एक जन अज्ञानी आहे म्हणून तो कोणाकडून तरी शिकत आहे ही धारणा पक्की होत जाते. शिक्षण हे तर अंहकारमुक्तीचे व्दार आहे. शिकणे कधीच अहंकार वाढवू शकत नाही. त्यामुळे विनोबा म्हणतात, की शिक्षणाच्या प्रक्रियेत असलेले शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्हीही एकमेकाच्या सोबत शिकत असतात. त्यामुळे शिक्षक हा निरंतर विद्यार्थीच असतो हा विचारही जगण्यात अधोरेखित होतो आणि विद्यार्थी देखील आपल्या शिक्षकाकडे पाहून आपली वाट निर्माण करत असतो. शिक्षकांचे निरंतर शिकणे हेच त्याचे विद्यार्थी असल्याचे लक्षण आहे.

जगातील अनेक भाषामध्ये ‘शिकवणे’ ह्यासाठी शब्द नाही.अनेक भाषेमध्ये तर केवळ ‘शिकणे’ यासाठीच शब्दांचे आस्तित्व आहे. आपण शिक्षणाची प्रक्रिया करतो तेव्हा शिकवणे व शिकणे अशा शब्दांचे उपयोजन करत असतो.यातील शिकवणे म्हणजे केवळ पाठयपुस्तकातील पाठाचा अनुभव देणे नाही. विद्यार्थी तर स्वतःहून शिकत असतो .अशावेळी शिकवणे म्हणजे विद्यार्थी असेल किंवा सहकारी असेल त्यांना शिकण्याला मदत करणे होय. इंग्रजी भाषेत जसा ‘टीच’ हा शब्द आहे त्याप्रमाणे आपल्या भाषेत त्या अर्थाच्या शब्दाचे आस्तित्व नाही.भारतीय पंरपरेत गुरू शिष्याला शिकवत नाही, तर त्याला शिकण्याची वाट निर्माण करून दिली जाते. त्याला ज्या वाटेने जायचे आहे त्या वाटेने जाताना शिक्षक म्हणून मदत करणे आहे.

विद्यार्थी स्वतःहूनच शिकू शकतो, शिक्षक शिकण्यात मदत करू शकतो , मात्र त्याला आपण शिकवू शकत नाही हे आपले शिक्षणातील तत्वज्ञान सांगते. शिक्षणाचे तत्वज्ञान समजावून घेताना आपल्या पंरपरेत शिकविण्याची पंरपरा नाहीच.अनेकदा गुरू आपल्या शिष्यांना जंगलात पाठवणे आणि तेथे निसर्गासोबतचे जगण्याचे अनुभव घेत असताना त्याचे शिकणे घडेल असे पाहिले जात होते.गुरू जाणीव पूर्वक शिकवत नव्हते जगण्याचा अनुभव हा शिक्षणाचा राजमार्ग आहे हे लक्षात घेऊन शिक्षणाचे धडे गिरवले जात होते.

विनोबा म्हणतात ,की “इंग्रजीत एक शब्द ‘लर्न’ आहे व दुसरा ‘टीच’ आहे . इंग्रजाच्यामते शिकणे ही आणि शिकविणे या दोन्हीही स्वतंत्र क्रिया आहे ” . मी शिकवतो म्हणून मुले शिकतात हा शिक्षकाचा अहंकार आहे. हा अहंकार जोपर्यंत आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत शिक्षणाचे असलेले खरे तत्त्वज्ञान आपल्या लक्षात येणार नाही. ज्याव्दारे अहंकाराची वृध्दी होते ते शिक्षण नाही. शिक्षणातून स्वतःची ओळख अपेक्षित आहे आणि त्याचवेळी जगातील ज्ञानाच्या विस्ताराची जाणीव होण्याची गरज आहे.शिक्षणाचे कार्य हे अहंकार निर्मिती अथवा वृध्दीचे कार्य नाही.शिक्षणातून निरहंकार वृत्तीची पाऊलवाट निर्माण होण्याची आवश्यकता असते . शिक्षणातून शिक्षण सेवा भाव निर्माण करत असतो. शिक्षकांची जी अनेक लक्षणे नमूद करण्यात आली आहे.त्यात शिक्षकांच्या अंगी सेवाभाव आणि सेवावृत्ती महत्वाची आहे. शिक्षक विविध स्वरूपाची सेवा करत असतो..तो ग्रामविकासास हातभर लावत असतो.विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी शिकतो, समाजाचे उत्थान घडविण्यासाठी सज्ज असतो.

शिक्षक नेहमी राष्ट्र विकासासाठी सज्ज असतो. यासोबत ते विद्यार्थ्यांची देखील सेवा करत असतो. त्या सेवेत त्याचा नम्रपणे दर्शित होत असतो.आपण विद्यार्थ्यांची ज्ञानसेवा करतो हा उपकार नाही. विद्यार्थ्यांची सेवा करणे ही वृत्ती आहे.जशी शिक्षकांची वृत्ती असते त्याप्रमाणे विद्यार्थी नम्रपणे शिक्षकांपासून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. यातील कोणीच अहंकारचे दर्शन घडवत नाही.दोघेही आपल्यातील परस्परभाव जोपासण्याचा प्रयत्न करत असतात.या प्रक्रियेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते परस्परांमधील सहकारी मानत आपला प्रवास करत असतात. सहकारी म्हणून आपण जेव्हा एकमेकाशी वागतो तेव्हा त्यात सहकार्याचा भाव असतो. प्राचीन काळात दोघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करीत असत. एकत्रित येऊन दोघेही सोबत प्रार्थना करत असे. ‘तेजस्वि नावधीतमस्तु’ या प्रार्थनेतील मागणे काय आहे , तर आम्हा दोघांचे शिकणे हे तेजस्वी बनावे. यात ‘नौ’ शब्द आहे. तो व्दिवचनी आहे. याचा अर्थ आम्ही म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी असा आहे. शिक्षक आपण शिकवत आहेत असे मानत नाही. विद्यार्थी शिकत आहे असेही तो मानत आहे.शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी शिकत आहेच आणि त्याचवेळी शिक्षक देखील शिकत आहे.याचा अर्थ विनोबा म्हणतात ,की शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकत्रित जीवन जगत आहेत, एकत्रित अध्ययन करीत आहे अशी भावना आहे. विद्यार्थी जेव्हा शिकत असतो तेव्हा शिक्षकही शिकतो मात्र तरीसुध्दा शिक्षक विद्यार्थ्याला जेथे मदत लागेल तेथे विद्यार्थ्याला मदत करीत असतात.

शिक्षक हे जी मदत करतात तेथे ते आपल्याला काही शिकवत आहे अशी त्यांची भावना नसेत.त्याचवेळी शिक्षकही असे मानतो की विद्यार्थी देखील आपल्याला मदत करीत आहे.अनेकदा शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत जेव्हा सहकार्य करण्याचा भाव जोपासत काम करतात तेव्हा त्यांचेही शिकणे सुरू असते. परस्पर उपकाराच्या उपकृत झाल्याच्या भावनेने दोन सहकाऱ्यांमध्ये शिक्षणाचा व्यवहार होण्याची गरज असते.उपकार हे ऋण आहे.त्या ऋणातून उतराई होण्यापेक्षा एकमेकाला समृध्द करत प्रवास करणे हे कितीतरी चांगले आहे.दोघेही एकमेकाकडे पाहत शिकत असतात.दोघांमध्ये शिकण्याचा भाव असतो..शिकण्यातील अडथळे दूर करत प्रवास करणे असते.अनेकदा मुलांकडून शिक्षक काय शिकणार असा प्रश्न असतो , पण मुलांशी आपण मुक्त संवाद करत गेलो तर आपल्याला निश्चित अनेक प्रश्न असे असतात , की त्या प्रश्नांच्या माध्यमातून शिक्षक स्वतः समृध्द होत असतो.अनेकदा मुलांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असत नाही. त्यावेळी अनेक संदर्भ शोधावे लागतात.जगाच्या पाठीवर ज्ञानाच्या प्रक्रियेत कोणीच परिपूर्ण असत नाही. ज्ञानाचे विश्व प्रचंड मोठे आहे.

त्या ज्ञानाच्या समुद्रात पोहण्यास सुरूवात केली,की आपल्याला आपल्यातील उणिवाचा शोध लागत जातो.आपण शिकवत असलेले पुस्तक म्हणजे काही जीवनातील अंतिम सत्य नाही.एका मुलीने एका वैज्ञानिकाला विचारले होते , की यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेले , की गुरूत्वाकर्षन शक्ती कार्यरत राहत नाही ,मग एखाद्या यानात कोळी आपले जाळे कसे विनत असेल ? कारण जाळे विणण्यासाठी तर गुरूत्वकर्षाचा उपयोग केला जातो.प्रश्न इतका साधा असला तरी उत्तर मात्र साधे नव्हते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणजे स्वतःचे शिकणे असते. विनोबांचा असेलला दृष्टीकोन हा एकमेकाकडून शिकण्याचा आहे.जीवनातील अनुभव हिच पाठशाळा आहे.जीवन आणि शिक्षण हे सोबत होत असते म्हणून त्यांनी गांधी विचार पुढे नेताना मांडलेल्या नई तालीम शिक्षण विचारांमध्ये पुस्तकांना गौणस्थान दिले आहे. यामुळे अनकेदा अनेकाना असे वाटते , की शिक्षण घ्यायचे आहे आणि हाती पुस्तक नाही मग ज्ञान कसे मिळणार ? ज्ञान फक्त पुस्तकात आहे ही आपली धारणा मुळात चुकीची आहे.ज्ञान तर आपल्या भोवतालमध्ये प्रचंड साठलेले आहे.ज्ञानाच्या अनेक स्त्रोतांपैकी पुस्तक हा एक स्त्रोत आहे.मात्र पुस्तके म्हणजे हे काही सत्य नाही.

आपल्या शिक्षण प्रक्रियेत शिक्षक शिक्षण देत आहे आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहे ही असलेली पक्की धारण संपुष्टात आणण्याची गरज आहे. हा असलेला भेद नष्ट झाला पाहिजे. गुरू शिष्याला बरेच काही देतो, परंतु सोबत तोही बरेच काही मिळवत असतो. या देवाणघेवानीत कोणालाच अभिमान असत नाही. विनोबा म्हणतात ,की आई मुलाला दूध पाजते, त्याचा तिला अभिमान असतो का ? ती पाजणार नाही, तर चालेल का ? स्तनपानाच्या क्रियेत आई आणि मूल, दोघांनाही आनंद मिळतो. दोघांची त्यात समान भूमिका असते. त्याप्रमाणे शिक्षणाचा देखील तसाच विचार असायला हवा. शिक्षक आणि मुले दोघेही एकमेकांच्या आचरणापासून शिकत असतात. विनोबांचा शिक्षकांपेक्षा आचार्यांवर अधिक विश्वास आहे.आचार्च म्हणजे पदवी नाही तर जीवनानुभवाची समृध्दता ज्यांना लाभली अशी व्यक्ती.जीवन प्रवासातून ज्यांने ज्ञान प्राप्त केले आहे.ज्याच्या जीवन चरित्रातून आणि वर्तनाकडे पाहत विद्यार्थी शिकत आहे असा जीवनाची वाट चालणारा जो कोणी असेल तो आचार्य असतो. शिक्षणाच्या प्रक्रियेत काम करणारे कोणीच गुरू नाही सारेच विद्यार्थीच असतात.विनोबा म्हणतात ,की जे दिले जात नाही ते शिक्षण .शिक्षण देण्याचा विचार केला जाऊ शकत नाही.

शिक्षण देण्याचा विचार नको. जे घेतले जाते, ज्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो किंवा ज्याची काही नोंद ठेवली जाऊ शकते ते शिक्षण नाही. शिक्षणाची मोजदाद करता येत नाही.शिक्षणाचा विचार देणे घेणे अशा स्वरूपात करता येत नाही. आपण जे जीवन जगत असतो,त्यातून जे अनुभव मिळतो,त्या अनुभवात जे स्वतःचे मूल्य आणि तत्व निश्चित करतो तेच खरेजीवनच शिक्षण आहे.आपण अन्न सेवन करतो.त्या अन्नात कॅलरी असतात.पण ते अन्न खाले तर आपण अमूक अमूक कॅलरी खाल्या असं म्हणू शकतो मात्र खालेले अन्न किती पचले हे महत्वाचे असते. कॅलरीचा खरा हिशोब कागदावर नव्हे शरीरावरच दिसून यायला हवा.अन्न पचले तर शरीराचे पोषण होते खालेले अन्न पचले नाही तर त्या अन्नाचा शरीराला काय उपयोग ? तसे शिक्षणाचे असायला हवे. जे अनुभवले,अनुभवलेले पचायला हवे,ते आपल्या मस्तकात रूजायला हवे, रक्तात मुरायला हवे.ते जर मुरले तर ते खरे शिक्षण.केवळ माहिती वाचली आणि त्या पुस्तकातील माहितीने आपल्या जीवनात काहीच उपयोग झाला नाही तर त्या अक्षरांना कोणतेच मोल नाही. शिक्षण हे शिकण्यासाठी,पदवीसाठी नाही तर जगण्यासाठी आहे. जे शिकले ते पचायला हवे. शिक्षण तर अगोदर शिक्षकांमध्ये पचायला हवे. सत्य बोला असा सुविचार सांगितला,फळ्यावर लिहिला तर ते केवळ शब्द आहे.मात्र ते शब्द जगण्यात अधोरेखित झाली तर ते खरे शिक्षण असते.ज्या दिवशी सत्य ही वृत्ती आणि प्रवृत्ती बनेल तेव्हा शिक्षण झाले असे म्हणता येईल.महाभारतातील धर्मराजाच्या जीवनात सत्यं वद या विचाराचे शिक्षण झाले होते.महात्मा गांधीची वाटही तीच होती.त्यांना शिक्षण पचले होते.

त्यामुळे शिक्षकांच्या जीवन अनुभवाच्या वाटेसोबत विद्यार्थी प्रवास करतील तर शिकणे होईल. त्याकरीता शिक्षक मुलांबरोबर काम करतील आणि मुले शिक्षका बरोबर. ही सोबत म्हणजे केवळ शरीराची असता कामा नये.ती हदयाने बांधलेले नाते असायला हवे. शिक्षकाला वाटले पाहिजे , की मी मुलांबरोबर काम करीत आहे आणि मुलांना वाटले पाहिजे की आम्ही शिक्षकाबरोबर काम करीत आहोत. एकमेकाशी घटट नाते बांधले जायला हवे. जिथे शिक्षकाला आपण शिक्षण देत आहोत अशी जाणीव होत असेल आणि जिथे मुलांनाही वाटत असेल ,की आम्ही शिक्षण घेत आहोत, तिथे कुठलेही शिक्षण दिले जात नाही आणि घेतले जात नाही ही विनोबाची धारणा वर्तमानात शिक्षणाचा पुनर्विचार करायला भाग पाडत असते.जेथे शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी शिकतो असा विचार आला ,की शिक्षण संपलेच म्हणून समजा ! हा विनोबाचा इशारा अधिक गंभीरपणे घ्यायला हवा .आपल्या शिक्षणातून खरोखर उत्थान घडवायचे असेल तर त्याला कोणताही पर्याय नाही .अन्यथा केवळ शिक्षणातून पदवी घेतलेला शिक्षित समाज उभा राहील आणि सुशिक्षित होण्यासाठी पुन्हा नव्याने शिक्षणाचा प्रवास घडवावा लागेल.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या