Monday, November 25, 2024
Homeब्लॉगशिक्षणच घडवेल परिवर्तन

शिक्षणच घडवेल परिवर्तन

जगात शिक्षणाच्या इतिहासात शिक्षण गुणवत्तापूर्ण असायाल हवे असा विचार सातत्याने मांडण्यात आला आहे. शिक्षणाच्या इतिहासाची पाने चाळली तर शिक्षण गुणवत्तापूर्ण होते असे फारसे दिसत नाही. खरं तर गुणवत्ता म्हणजे नेमके काय? हे व्याख्येत बांधण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे. मात्र त्या व्य़ाख्येत अपेक्षांची भिन्नता दिसून येते. शिक्षणाच्या प्रक्रियेत आपण गुणवत्तेचा जो विचार करतो आहोत आणि त्यात गुणवत्तेची जी कल्पना आहे ती व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. समाज जसा जसा गतीमान होत जातो त्याप्रमाणे शिक्षणाकडून देखील अपेक्षा सतत बदलत जाता आहेत. जगभरात होणारी संशोधने, औद्योगिक विकास, समाजात रूजणारे विज्ञान, बदलणारी राजकीय विचारधारा यानुसारही शिक्षणाकडून अपेक्षा बदलत जातात.

वर्तमानातील अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षणाकडून होण्याची गरज असते.मात्र त्या अपेक्षा शिक्षणातून साध्य होतील असे घडत नाही. वर्तमानातील अपेक्षा शिक्षणाकडून पूर्ण झाल्या नाहीतर शिक्षण गुणवत्तापूर्ण नाही असे मानले जाते.त्यामुळे शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न व्यवस्थेत सातत्याने होत असतात.प्रयत्न जसे होत जातात त्याप्रमाणे अपेक्षा पुन्हा उंचावत जातात हेही वास्तव आहे.शिक्षणातून अपेक्षा असतात आणि त्यापूर्ण करण्यासाठी काळ लागत असतो.त्यामुळे वर्तमानातील अपेक्ष पूर्ण करण्यासाठी भविष्यात वाट चालावी लागते.वाट जशी चालत जातो त्याप्रमाणे अपेक्षा पुन्हा पुन्हा उंचावत जातात.त्यामुळे शिक्षणात अपेक्षां पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कधीच नसते.

- Advertisement -

आपल्या देशात शिक्षणाचे सार्वत्रकीकरण झाले नव्हते तेव्हा गुणवत्तेच्या अपेक्षा फारशा नव्हत्या. कधीकाळी केवळ विद्यार्थी शाळेत येणे त्याला टिकवणे आणि शिकवणे अपेक्षित होते. भूतकाळात विद्यार्थ्याला लिहिते, वाचते आणि गणन करण्याच्या क्षमता प्राप्त करण्याच्या अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले असे मानले जात होते. शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार हा केवळ अक्षर साक्षरतेपुरता मर्यादित होता. आज साक्षरतेचा हा मर्यादित विचार कालबाहय होत चालला आहे. अक्षराची साक्षरता असलेली माणसं शिकली असं म्हणतात त्याला पुरेशा क्षमता तरी प्राप्त झाल्या आहेत का ? याचा विचार केला जाऊ लागला आहे.

अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांना कितपत क्षमता प्राप्त झाल्या आहेत .यानुसार केंद्रसरकार आणि राज्य सरकार गुणवत्तेचे मोजमाप करू लागले आहे. पण तेही विविध सर्वेक्षणात होणारे मापन हे देखील आकलनाचे आहे.त्यामुळे आकलन हे काही शिक्षणाचे यश नाही.उत्तम जीवन जगण्यासाठी लागणारे मूल्य,गाभाघटक,जीवन कौशल्य ,21 व्या शतकासाठीचे कौशल्य कितपत साध्य झाले आहेत याचे मापन करण्याची गरज आहे. जीवनात शिक्षणाचे मोल अनन्यसाधारण असले तरी ते अपेक्षित क्षमता, कौशल्य गुणवत्तेने साध्य झाले तरच परिवर्तन होईल.

आपल्या परीक्षांच्याव्दारे होणारे मूल्यमापन हे आजही पाठयपुस्तक आणि त्यातील आशयापुरतेच मर्यादित आहे.त्यामुळे तेथे मिळणारे मार्क म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता हे म्हणणे संयुक्तीक नाही. कारण उच्च श्रेणीचे मार्क मिळवणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले आहे असे काही घडले नाही. ज्या विद्यार्थ्यांना शालेय परिक्षेत कमी मार्क मिळाले आहेत ते जीवनात अपय़शी झाले आहेत असे नाहीत. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ही मार्कावर मोजणे म्हणजे आपला आत्मघात करून घेणे आहे. मार्क आणि जीवन यांचे काही नाते वर्तमानात दिसत नाही.

आज शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे माहिती तंत्रज्ञानाशी जोडणे झाले आहे.जे विद्यार्थी शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करतात ते विद्यार्थी गुणवत्तेचे आहेत असे कसे मानायचे ? मात्र 21 व्या शतकाची परीभाषा माहिती तंत्रज्ञानाशी नाते सांगत आहे.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा विचार केला जाऊ लागला आहे. विद्यार्थी संगणक ज्ञानाने युक्त असायला हवा अशी अपेक्षा केली जाते आहे.गुणवत्तेच्या ज्या व्याख्या केल्या जाता आहेत त्या सा-या व्याख्या एका एका कौशल्यांशी नाते सांगणा-या आहेत. जो ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याला त्याच्या क्षेत्राशी जोडून गुणवत्ता हवी आहे. शिक्षण तर समग्र विकासाची परीभाषा करत आहे. आपण वर्तमानात ज्या गुणवत्तेचा विचार करतो आहोत त्या समग्र विकासाचा विचार करत नाही आहोत.त्यामुळे व्यापकतेने शिक्षणाकडे पाहण्याची गरज आहे.शिक्षणाची गुणवत्ता जीवनाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.त्यामुळे जीवनात किती समृध्दता आली तीच खरी गुणवत्ता.

आज शिक्षणाची गुणवत्ता मोजण्याची साधने बदलत चालली आहे.परीक्षा हे एकमेव साधन नाही. अलिकडे विद्यार्थ्यांना आवडणा-या शाळांपेक्षा पालकांचा प्रभाव अधिक पडतो आहे. पालकांना शाळां गुणवत्तापूर्ण हव्या आहेत.मात्र शाळा गुणवत्तापूर्ण हव्यात त्यातील अपेक्षित गुणवत्ता केवळ भौतिक सुविधांची आहे.त्यांच्यासाठी जी गुणवत्ता आहे त्या शाळा केवळ भौतिक सुविधांनी युक्त आहेत.त्या शाळांमधून शिक्षणाची उददीष्टे कितपत साध्य होता आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. अलिकडे पालकांचा आणि समाजाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शाळा म्हणजे भौतिक सुविधांची रेलचेल अशी व्याख्या झाल्या आहेत. कधीकाळी शाळा म्हणजे केवळ खडू,फळा आणि झाडाखाली बसणे व्हायचे तरी शिक्षणाचा प्रवास घडायचा.त्यातूनही अनेकाचे आयुष्य उज्जवलतेने सजलेले आपणास अनुभवास येते.

कर्मवीरांच्या शाळां अशाच अनेकदा झाडाखाली भरल्या आहेत आणि तरी त्या शाळा गुणवत्तापूर्ण होत्या.त्यातून या भूमीला अनेक विद्वान,विचारवंत आणि उत्तर विचाराची लोक मिळाली आहेत.त्यांच्या विचारप्रक्रियेमुळे समाज समृध्द झाला आहे.समाजाची व राष्ट्राची प्रगती साध्य करण्यासाठी लागणारे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ जी शिक्षण व्यवस्था उभी करते ते गुणवत्तापूर्ण शिक्षण असते.आज दुर्दैवाने अशा शिक्षणाचा विचार केला जात नाही हे लक्षात घ्यायला हवे.कधीकाळी केवळ खडू फळ्यांने शिक्षण सुरू व्हायचे तो खडू फळा आज कालबाहय झाला आहे.

आज सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलातील शाळा स्मार्ट झाल्या आहेत. उंच उंच इमारती, वर्गावर्गात उपलब्ध असणारे स्मार्टबोर्ड, शाळेच्या आवारात असणा-या वाहतूकीच्या गाडया,पिण्याच्या पाण्यासाठीची सुविधा असं बरेच काही असेल की तेथे शिक्षण गुणवत्तेचे मिळते असे मानले जाते. गुणवत्तेसाठी ज्ञानाची प्रक्रिया महत्वाची असते. शिक्षणाचा आत्मा भौतिक सुविधा नाही तर ज्ञानाची निर्मिती हाच आहे. आज तर गुणवत्तेची व्याख्या बदलत चालली आहे.आज आपली सारी स्पर्धा शिक्षण स्मार्ट करण्यासाठी सुरू आहे. बदलणारी व्याख्या समाजाला कुठे घेऊन जाणार आहे हा खरा प्रश्न आहे. आज असणारे हे स्मार्ट शिक्षण समाज परिवर्तन करू शकले का ? समाजाची उन्नती, समृध्दता साधू शकेल का ? हा प्रश्न आहेच.

शिक्षण संस्थाच्या जाहीरात पत्रकावर आपण नजर टाकली तर त्यात शिक्षणाचा आत्माच्या विकासासाठी असलेल्या गोष्टींचा अभाव आहे.त्यात जेथे आहेत तेथील त्या सुविधा फक्त तोंडी लावण्यापुरते मर्यादित आहेत.त्या जाहिरातीत उंच इमारती,गाडया,मग त्या सुविधांना जी.पीयएस व्यवस्था असं बरेच काही छापलेले असते. शिक्षणात महत्वाच्या नसलेल्या सर्व सुविधां स्मार्ट असल्याचा उल्लेख आहे , मात्र शिक्षण म्हणून जे स्मार्ट असायला हवेत ते शिक्षक, ग्रंथालय,प्रयोगशाळांना फारसा प्राधान्य त्या जाहिरातीत दिसत नाही. गुणवत्ता असलेले शिक्षक, त्यांचे शिक्षण, अनुभव, त्यांचे शालेय प्रक्रियेतील विशेष योगदान, त्यांच्या नावावरील पुस्तके,विविध प्रकारचे सामाजिक योगदान महत्वाचे वाटत नाही. त्यांनी शिक्षण प्रक्रियेतील योगदानाचा विचार केल्याशिवाय शिक्षण गुणवत्तापूर्ण कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

शिक्षणाच्या प्रक्रियेत वर्ग आणि तेथील शिक्षक जितके महत्वाचे असतात तितकेच किंबहुना अधिक महत्वाचे ग्रंथालय असतात. आज मात्र ते ग्रंथालयांचे आस्तित्व शोधावे लागावे अशी परीस्थिती आहे.विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असेल तर अध्ययन अनुभव अधिक महत्वाचे आहे.प्रत्यक्ष कृतीकरून शिकणे महत्वाचे असल्याने प्रयोगशाळा महत्वाच्या भूमिका बजावत असतात .मात्र या सुविधांची जाहिरातीत उल्लेख असतोच असे नाही.जेथे केलेला असतो त्यांचा दर्जाही अदखलपात्र असतो.त्यामुळे शिक्षणाचा बदललेला प्राधान्यक्रम आणि दिशा यातून स्पष्ट होत जातो.शिक्षणाचा आत्मा ज्यात सामावलेला आहे त्या सुविधा अधिक गुणवत्तेच्या दृष्टीने त्यांचा विचार करणारी व्यवस्था समाजाने उभी करण्याची गरज आहे.

शिक्षणातील आत्म्याला जागृत करणारी व्यवस्था शिक्षणातून निर्माण करण्याची गरज असते.जे शिक्षण आत्म्याला जागृत करत नाही ते शिक्षण कुचकामी म्हणायला हवे. अलिकडे शिक्षणातून आत्मा जागृतीचा विचार का हरवत चालला आहे ? की जाणीव पूर्वक शिक्षण द्या दिशेने जाणार नाही याची काळजी घेतली जाते आहे.शिक्षण हा विचार आहे,शिक्षण ही शक्ती आहे. शिक्षण म्हणजे परिवर्तन आहे.त्यामुळे शिक्षण म्हणजे बंडखोरी आहे.लाओ सारखे विचारवंत शिक्षणाबददल म्हणतात की, “ राजाने प्रजेला फार ज्ञान देऊ नये , नाहीतर ती बंड करून उठेल..” त्यामुळे चांगले शिक्षण न पोहचवण्याचे शिवधनुष्य तर व्यवस्थेने पेलण्याचा विचार केलेला नाहा ना ? याचा विचार करायला हवा.शिक्षण गुणवत्तापूर्ण केले तर लोकांना सत्याची वाट अधिक महत्वाची वाटेल. सत्तेच्या वाटेचा प्रवास घडण्याची शक्यता अजिबात नाही.समाज जीवनातील अनेक प्रश्न त्यातून निकाली निघतील.त्यासाठी शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या