शिक्षणातून प्रत्येक विषयातून विशिष्ट प्रकारची कौशल्य प्राप्त करायची असतात. शिक्षणाची ध्येय आणि उददीष्टाचां विचार केला तर प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वला आकार देण्याचे काम शिक्षणातून होत असते. तो आकार देण्यासाठी विविध विषयातून विविध कौशल्यांचा विकास अपेक्षित आहे. त्यानुसार विकासाची प्रक्रिया झाली तर बरेच काही हाती लागण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षणाने माहिती पेरण्याऐवजी ज्ञानाच्या निर्मितीवर भर देण्याची गरज सातत्याने व्यक्त करण्यात येते.
ज्ञान निर्माण झाले तर जीवन समृध्द होण्याबरोबर आनंद अनुभूतीचा भावही त्यांना लाभेल. त्यामुळे जीवनात अधिक सुखास पात्र ठरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षणाचा विचार करण्याची नितांत गरज आहे. आपण शिक्षणातून अपेक्षित उददीष्टे साध्य करू शकलो तर निश्चितच संघर्ष देखील कमी झाल्याचा अनुभव आपल्याला अनुभवता आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे संवादाचे आणि माणसांला जाणून घेण्यासाठीचा प्रवास आहे.
शिक्षण हे मुळांत संवादासाठी आहे.माणसांमाणसांतील संवाद अधिक उंचावत गेला तर जीवनात यशाचे शिखर फार दूर नाही.शिक्षण हे काही केवळ शालेय विषय शिकणे आणि मार्क मिळवण्यापुरते मर्यादित नाही हे प्रथम लक्षात घ्यायला हवे.जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षणातून होत असते.त्यामुळे जीवन उनन्तीसाठी शिक्षण आहे.त्यासाठी जीवनात कौशल्यांचा विचार महत्वाचा ठरतो. आपण माहिती घेऊन पोपटपंची फार चांगली करू शकू पण जीवनात आवश्यक असलेले यश नाही मिळू शकणार. त्याकरीता संवाद महत्वाची गोष्ट आहे.भाषेतून जी अनेक कौशल्य आपल्याला साध्य करायची आहे त्यातील श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही कौशल्य अधिक महत्वाची आहेत. या कौशल्यांच्या जोरावरच आपण अधिक विकासाची प्रक्रिया करू शकू. ही भाषिक कौशल्य जरी असली तरी ती मुळतः सर्व विषय शिकण्याची साधने आहेत हे लक्षात घ्यायला हवेत.
आपल्याला जीवनात यश हवे असेल तर संवाद कौशल्य हवे आहे.संवादाचे कौशल्य उत्तम असेल तर आपल्याला जीवनातील अनेक संघर्षापासून मुक्ती मिळवता येईल.त्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून बाजार आणला.बाजारातील वस्तू घरात आल्या.बराच वेळ बाजारात खर्ची पडल्यानें बायकोने आल्या आल्या स्वपंयाकाचे काम सुरू केले.घरातील पोराबाळांना दोन दोन घास खाऊ घालण्याची गरज होती.दिवसभराच्या फिरण्याने दोघेही थकले होते.त्यामुळे काम आवरताच दोघांनी निद्रेच्या स्वाधीन केले.सकाळी उठून काल आणलेला किराण पती भरून ठेवू लागला.आपले पती किराणा भरत आहे हे पाहिल्यावर बायको म्हणाली “ राहू दया ,तुम्हाला काही कळणार नाही. कोठेही काही ठेवून द्याल.. “ आणि भांडण सुरू झाले. यात शब्द कठीण होते पण त्यापेक्षा आवाजातील स्वर अधिक कठोर होते. त्यामुळे पतीचा रागही अनावर झाला होता.
खरेतर ज्या शब्दांनी संवाद केला जात होता तेच शब्द होते , पण त्या संवादाचे विसंवादात रूपांतर झाले होते. शब्दाचा अर्थ उलगडून दाखविण्याची आता गरज आहे.शब्द जपून वापरावेत ,कारण ते शस्त्र आहेत असे बोलले जाते मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. शब्दांना अर्थ असतो.त्यात एक भावार्थ असतो.आपल्या शब्दांचे अर्थ जाणता यायला हवे असतात.अनेकदा संवादात एकाला अर्थ माहीत असेल आणि दुस-याला शब्दांचे अर्थ माहीत नसेल तरी विसंवाद होण्याची शक्यता असते.शब्दांचे अर्थ जाणून घेण्यात आपण जसे कमी पडतो त्याप्रमाणे एकमेकाला समजावून घेण्यात देखील कमी पडतो आहोत.
शब्दांचे अर्थ न जाणता आपण प्रवास सुरू ठेवला तर फुलासारखे गंधीत असणारे शब्दच शस्त्रासारखे धारदार बनतात.हदयांने जाणून घेण्याचा प्रयत्न सोडला , की मस्तकात संतापाची लकेर उमटू लागतात..त्यामुळे संसारातील गोडवा हरवतो.जीवनातील वाटही अधिक अंधारलेल्या दिसू लागतात.आपल्याला संवाद आणि शब्द यांचा मेळ घालता आला नाही की मग केवळ तडजोड सुरू ठेवावी लागते. म्हणूनच संवादासाठी शहाणपणाची आणि प्रेमळ हदयाची गरज आहे. त्या शिवाय शब्दांना अर्थाचा गोडवा प्राप्त होणार नाही.
जीवनांत सुखाचा प्रवास सुरू करायचा असेल ,तर तो प्रवास करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे.ज्याला म्हणून आपण सुख म्हणतो ते काही कोणी घेऊन येत नाही आणि रेशनच्या दुकानात पैसे देऊनही मिळत नाही.समर्थ रामदासांनी म्हटले आहेच की, “ जगी सर्व सुखी असा कोण आहे.. विचारी मना तूची शोधूनी पाहे ”. त्यामुळे सुखाचा सदरा घातलेला माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही.जीवनांत दुःख ठासून भरलेले आहे.संत तुकारामांनी म्हटले होते की, “ सुख पहाता जीवापाडे..दुःख पर्वता एवढे..” इतकेसे असणारे सुखही आपण संवाद हरवून विसंवादात रूपांतरीत करून आणखी दुःख का निर्माण करतो.. संवादात विसंवाद निर्माण झाला याचे कारण एकमेकाला समजावून घेण्यात नाते कमी पडते. त्याचवेळी शब्दांचे माधुर्य आणि त्यातील भाव लक्षात न घेता केवळ बोलणे सुरू राहिले. नात्यात प्रेमरस ओतप्रोत भरलेला आहे.मदतीचा हात देण्याची इच्छा आहे. त्यामुळे पतींने जो विचार केला होता.त्यात पत्नीला स्वयंपाक करता करता तीच्या कामाच्या तणावातून सुटका व्हावी म्हणून, मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा भाव होता. त्या मदतीच्या भावनेने पती किराणा वेगळा करून पत्नीलाच मदतीचा हात देऊ पाहत होता.
पत्नीने या मदतीला समजावून न घेता “ उठा फार मोठा दिवा लावणार आहात..कोणते काम धड केले तर शपथ आहे.एक काम कराल तर काम वाढून ठेवाल.. “ असे उफराटे बोल ऐकविले होते. यात काय झाले होते तर शब्दांची अदलाबदल झाली होती.ते कठोर शब्दांऐवजी जर योग्य आणि अर्थपूर्ण शब्दांचे उपयोजन केले असते तर आनंद प्राप्त झाला असता.शब्दांमुळे खरेतर टोकाचा विसंवाद होतो.कदाचित हे खरे असेलही की, पतीला कोणत्या वस्तू कोठे ठेवायच्या, कशा ठेवायच्या हे माहीत नसेल. पण त्या वस्तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे ठेवायला हव्या असतील तर त्या गोडशब्दातही सांगता आल्या असत्या..किमान वस्तू जेथे ठेवल्या असतील त्या ठिकाणच्या वस्तू उचलून हव्या त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न झाला असता, तर पत्नीचाच भार कमी झाला असता.नव-याच्या मदतीचा तिटकारा करीत, शब्दांची उपरोधिक उधळण केल्यांने नव-याच्या मनात पत्नीसाठी असणार एक हळवा कोपरा बंद करण्याचा प्रयत्न झाला.
शब्दांच्या उपयोजनामुळे माणसं हदयाने जोडली आणि शब्दांवर प्रेम न करता ,अर्थ न जाणता शब्द पेरत राहिले तर मनामनातील प्रेमाचा झराही आटत जातो. संवादाकरीता प्रत्येकाची कृती महत्वाची असते.कदाचीत स्वतःच्या इच्छे प्रमाणे होणार नाही. मात्र त्यातून एक प्रवास सुरू झाला असता.कौतूकाचे दोन शब्द..शाबासकीची थाप एकमेकाच्या पाठीवर देता आली तर संसाराची चाके वेगाने धाऊ लागली असती. प्रत्येकाच्या कृतीत मदतीचा भाव असतो.तो केवळ प्रेमाचा परिणाम असतो.प्रेमापोटी माणूस कष्ट सहन करीत सर्वस्व अर्पण करीत असते .प्रेमाच्या संवादात जादू असते
त्या दिवशीही असेच झाले.दिवाळीचे दिवस होते. घराची साफसफाई सुरू होती.घरात शंभर किलो वजनांची धान्याची पोते होते.ते पोते हलविल्याशिवाय साफसफाई होणार नव्हती.पत्नींने अंत्यत प्रेमाने हाक मारली.. “ अहो ऐकल का.. ? मला ना तुमची मदत हवी आहे.तुम्ही नेहमीच मला मदत करतात.त्यामुळे खूप जगण सुसहय होते “.इतक्या गोड संवादाने पतीचे हदय घायाळच झाले होते.पती तात्काळ धावत आला..खरेतर पतीचे वजन पन्नास किलोच्या जवळ जाणारेही नसेल, पण पत्नीने हळव्या आणि हदयाला स्पर्श करणा-या शब्दांनी संवाद केल्याने तो पाचपन्नास किलोचा पैलवान नवरा..चक्क धावत पोते हलविण्याचा प्रयत्न करू पहात होता..जीव मुठीत आणून त्यांने पोते हलवले. प्रेमाचे शब्द कितीतरी काम हलके करीत असतात.एकमेकाला जाणून घेतले की मुके शब्दांना भावनेचे उमाळे फुटतात.शब्द चैतन्यमय असतात.ते कोरडे नाहीतच..ते हदयाचा ओलावा घेऊन येतात..तो ओलावा कोणाला आधार देतात तर कोणाला निराधार बनवतात..शेवटी संवादाकरीता जाणने आणि समजावून घेत पुढे जात राहणे हेच लोकहिताचे व स्वहिताचे आहे.
शिक्षणातून केवळ पाठ,कविता आणि विविध घटक शिकवून पुढे जाता येईल.मार्क मिळवता येतील मात्र त्यामुळे जीवन सुसहय होण्याची शक्यता नाही .जीवन सुसहय करण्याच एकमेव राजमार्ग हा शिक्षणातून शब्दांचे अर्थ आणि भाव जाणता येण्याची गरज आहे.आज आपण वाचते झालो पण केवळ शब्दातीस अक्षरे वाचतो आहोत , पण त्यापलिकडे त्या शब्दात दडलेला अर्थ जाणून प्रवास करण्यासाठी शब्दांच्या अर्थपूर्णतेचा अंतरिक प्रवास सुरू करायला हवा.शिक्षणातून पाठांतरा ऐवजी ज्ञानाच्या प्रक्रियेवर भर दिला जात नाही तोवर आपल्याला जीवनातील हरवलेला संवाद पुन्हा सुरू करता येणार नाही.आज आपले प्रश्न शिक्षणाच्या अभावाने निर्माण झालेले आहेत.त्याकरीता शिक्षणावर प्रेम असेल तर शब्द आपल्या भोवती गर्दी करतात. त्या प्रवासात आपल्याला सहजपणे जीवनाचा आनंद घेऊन प्रवास सुरू ठेवता येईल.
संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)