Monday, November 25, 2024
Homeब्लॉगमूळ गाभ्याशी नाते हवे....

मूळ गाभ्याशी नाते हवे….

जग वेगाने बदलत आहे. जगात सर्वच क्षेत्रात मोठया प्रमाणावर सातत्याने संशोधने होता आहेत. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. शिक्षणात संशोधन झाली आहेत आणि नवेनवे सिध्दांत समोर येतात, पण त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होत आहे. जगातील शिक्षणतज्ज्ञांनी मांडलेल्या विचारामुळे नवानवा विचार समोर येत असला तरी मुळचा शिक्षणाचा गाभा बदलला जात नाही हे लक्षात घ्यायला हवे. कदाचित मांडणीमुळे नवे नाव धारण केले जात असले तरी कदाचित नव्याने त्याची मांडणी होईल मात्र शिक्षणाचा गाभा तोच राहतो. खरंतर शिक्षण मूळापासून समजून घेतले तर अध्ययन अध्यापनाची मांडणी कशी आहे आणि कितीही वेगळी मांडण्याचा प्रयत्न झाला तरी मूळचा शिक्षणाचा अर्थ सुटत नाही.

शिक्षणाचे मूळ तत्वज्ञान तसेच राहते हे लक्षात घ्यायला हवे. विनोबानी वर्गातील अध्यापन नेमके कसे असावे? या बददल मांडलेले विचार काही दशकापूर्वीचे असले तरी तो विचार वर्तमानात आपल्या शिक्षणव्यवस्थेला टाकाऊ वाटत नाही. नई तालिममध्ये हाताला काम देण्याचा विचार प्रतिपादन करण्यात आला होता. पुढे कोठारी आयोगाने तोच विचार कार्यानुभवाच्या माध्यमातून पुढे आणला.वर्तमानात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही हाताला काम देण्याच्या दृष्टीने भूमिका प्रतिपादन करण्यात आली आहे.शिक्षणातून हाताला काम म्हणजे उत्पादन,पैसे मिळविणे या दिशेचा प्रवास नाही तर जीवनाभिमुख अनुभवाच्या आधारे आनंददायी शिक्षण आणि गुणवत्तेच्या दिशेचा प्रवास आहे.हाताने काम केले की शिकण्याचा प्रवास अधिक सुलभ होतो.

- Advertisement -

गांधी , विनोबा तेच सांगत होते. त्याचवेळी शिक्षण हे अनुभवाने युक्त आणि अधिक अनुभव संपन्न असायला हवे ,ते परीसराशी व्यवसाय,उद्योगाशी देखील जोडायला हवेत.त्यातून शिक्षण जीवनाभिमुख होण्यास मदत होणार आहे. मात्र समाजातील काही घटकांनी चरख्यावर सूत कताईचे शिक्षणाची टिंगल केली.गांधीच्या विचारातील मूळ जाणायला हवे होते पण त्यांच्या मांडणीकडे दुर्लक्ष करण्यातच काहींना आपले हित वाटले होते. त्यांच्या मूळ मांडणीला नव्या मांडणीचे स्वरूप देत मांडणी केली तर त्यातून मूळ गाभा हरवत नाही हे लक्षात घ्यायला हवे.त्यामुळे शिक्षण जीवनाभिमुख करण्यासाठीचे मार्गच विनोबाही सांगता आहेत. मात्र जीवनाभिमुख शिक्षणाचा विचार करताना अधिक अध्ययन अनुभव देण्याची गरज जशी आहे त्याप्रमाणे त्या अमलबजावणीत देखील अधिक सुक्ष्म विचाराची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे.

उद्योगाभोवती शिक्षण रचायचे अशी कल्पना पूर्वी मांडली जात होती.औदयोगिकीकरणानंतर जगभरातील शिक्षणाचा दिशा बदलण्यास सुरूवात झाली. उदयोगाभोवती शिक्षण रचायचे या कल्पनेविषयी मी आतापर्यंत निरनिराळ्या वर्गात जे पाहिले त्याने माझे समाधान झाले नाही असे मत विनोबांनी नोंदवले आहे.आपले शिक्षण उद्योगाशी जोडले जाण्याची गरज असल्याचे मत अलिकडे सातत्याने व्यक्त केले जाऊ लागले आहे. मात्र उद्योगाशी शिक्षण जोडण्याचा विचार केला जात असला तरी तो विचार अद्याप आपल्या शिक्षणात फारसा रूजला नाही. मुळात आपल्याकडे कार्यानुभव विषय शिक्षणात आणताना श्रमाचा विचार जशा आहे त्याप्रमाणे हाताला काही कौशल्य साध्य व्हावीत ही भूमिका आहे. ती कौशल्य मुलांच्या जगण्याची समृध्द वाट दाखवू शकतील. कौशल्याधारित स्वरूपाचे काम कलबाग आश्रमाने निर्माण केलेल्या शाळांमध्ये त्यासंदर्भात मोठया प्रमाणावर घडले आहे.

शांती निकेतनमध्ये टागोराचे प्रयोग शेतीशी निगडीत, पर्यावरणाशी संबंधित होते. मुले अनेकदा मातीशी खेळतात.त्यांना माती आवडते. त्यांना काही ऐकण्यापेक्षा,काही पाहण्यापेक्षा त्यांना करून पाहण्यात अधिक आनंद आहे. त्यामुळे विनोबा कृतीयुक्त शिक्षणाचा विचार प्रतिपादन करतात. अलिकडे शिक्षणतज्ज्ञ सांगता आहेत ,की शिक्षण अधिकाधिक पंचज्ञान इंद्रियांशी निगडीत असायला हवे आहे. त्यामागील विचारधारा गांधी विनोबाच्या विचाराशी नाते सांगणारी आहे. विनोबा म्हणतात ,की एका वर्गात शिक्षक एक गोष्ट सांगत होते. त्यांनी त्यातील आशयाचा संबंध शेवटी तकलीशी आणला होता. त्यानंतर तकलीविषयी गाणे सुरू झाले.त्यात कृत्रिमता वाटली.अनेकदा सहसंबंध सांगताना त्यातील नैसर्गिकता हरवली जाते. मुळात आपण कोणताही आशय ,घटक शिकवत असताना जो अनुभव,उदाहरणे देणार आहोत त्याच्याशी असणारा संबंध अधिक निकटचा असायल हवा. विद्यार्थ्यांशी नाते बांधले जायला हवे.आपण जी गोष्ट सांगतो ,तकलीसंबंधी कविता म्हणजे तकलीद्वारा शिक्षण नाही.अनेकदा आपण गणित शिकवायचे म्हणजे त्याकरीता विविध साहित्याचे उपयोजन करणे महत्वाचे आहे.

त्यादृष्टीने आपण किती सुक्ष्म विचार करण्याची गरज आहे हे विनोबानी अनेकांनी निर्देशित केले आहे. साहित्याचे उपयोजन करायचे आहे पण ते करताना आपण चांगल्या गोष्टी खराब करत तर नाही ना याची काळजी घ्यायला हवी. तकलीद्वारा गणित शिकवायचे म्हणजे मुलांना पंधरा-वीस पेळू देऊन त्यांत कमी-जास्त फरक करून त्यांच्याकडून बेरीज-वजाबाकी करून घ्यायची असे नव्हे. त्याने पेळू बिघडतात. त्याऐवजी खडे देऊनही बेरीज-वजाबाकी शिकविता येईल. उद्योगात गणिताची संधी पाहून ते शिकविले पाहिजे. कोणत्याही उद्योगात गणित तर गच्च भरलेले असते.एका अर्थाने आपल्या परिसरात मुलांना जे भावते त्या गोष्टी करण्याकडे आपला कल असायला हवा.आपण वापरणा-या वस्तू सहज उपलब्ध होणा-या असाव्यात.त्याच बरोबर टाकावूतून त्याचा उपयोग केला जात असेल तर अधिक उत्तम.विनोबा खडे वापरण्याचा विचार करता आहेत. खडयांशी खेळायला विद्यार्थ्यांना नेहमी आवडते.त्यामुळे वस्तूंचा उपयोग करण्याचे महत्व विनोबा सांगता आहेत आणि त्यात अधिक खोल विचार मुलांच्या आनंदाशी जोडलेला आहे.

आपणही अनेकदा अशा विविध अंगाने विचार करत अध्यापन करतो, मात्र त्या विषयाच्या संदर्भाने आपण अध्ययन अनुभव दिले तर त्या विषयी आपल्याला ज्या गोष्टी दिसल्या त्या विषयाच्या संदर्भाने नोंदी करण्याची गरज असल्याचे विनोबा सांगतात. त्या नोंदी आपल्याला बरेच काही शिकून जाणा-या असणार आहेत. प्रत्येक विषयात आपण कोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव आणि कोणत्या प्रकारचे साहित्यांचे उपयोजन करत आहोत हे महत्वाचे आहे. आपण आपल्या अनुभवाच्या संदर्भाने जे काही करत असतो ते अनुभव खरच पुरेसे आहेत का ? उदाहणार्थ सामाजिक अभ्यासात अमूक अमूक गोष्ट सांगितली, इतकी नोंद पुरेशी नाही. ती गोष्ट कोणती संधी साधून शिकविली हे विस्तारपूर्वक नोंदवले पाहिजे. आपण जेव्हा विस्तारपूर्वक एखादी गोष्ट नोंदवतो तेव्हा त्यामागील विचार महत्वाचा असतो.त्या विचारात नेमके काय साध्य होते आहे.हे लक्षात घ्यायला हवे.

आपण जेव्हा ज्ञानाची पेरणी करतो आहोत तेव्हा कोणतेही ज्ञान अप्रासंगिक द्यायचे नाही.आपण अधिकाधिक वेळा प्रासंगिक ज्ञानच देण्यावर भर दिला पाहिजे हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. सामाजिक अभ्यासाविषयी अशी एक समजूत झालेली दिसते की तो सर्व विषय उद्योगाद्वारा शिकवायचा आहे, पण ही कल्पना बरोबर नाही. किल्लीने जसे कुलूप उघडते तसे उद्योगाद्वारा जीवन उघडावयाला हवे. विनोबा प्रत्येक गोष्ट सांगत असताना किती सुक्ष्म आणि व्यापक विचार करायचे हे सांगता आहेत. ते म्हणतात ,की समजा पावसाचा दिवस आहे, तर वर्गात मुलांना पहिला प्रश्न हा विचारायचा , की शौच- मुखमार्जन करून आलात का? तो प्रश्न आजच कां विचारला, तर पावसामुळे शौचाला जायला मुले कंटाळतात म्हणून. घर, खिडक्या, दारे याबाबत माहिती देताना मी मुलांना विचारीन, खिडक्यांचा उपयोग काय? मुले सांगतील, उजेड आणि हवा आत यावी हा. मग मी विचारीन, छपरामध्ये खिडक्या केल्या तर उजेड आणि हवा मिळेल, मग अशा खिडक्या चालतील ? ते म्हणतील नाही. बाहेरची सृष्टी दिसली पाहिजे. मग मी विचारीन, तशाही खिडक्या करून देऊ, पण आत-बाहेर जाता आले नाही तर चालेल का ? ते म्हणतील नाही. बाहेरून आत, आतून बाहेर जाता आले पाहिजे. म्हणजे दारेही पाहिजेत. अशा रीतीने त्यांना खिडक्यांचा व दारांचा उपयोग समजल्यावर मी विचारीन, आपल्या देहात खिडक्या-दारे कोणती आहेत हे माहीत आहे का ? संस्कृतात डोळे, कान, नाक, तोंड वगैरेंना द्वार म्हटले आहे. ‘सर्वद्वाराणि संयम्य’, ‘नवद्वारे पुरे देही असे उल्लेख गीतेत येतात.

मनुष्याला खिडक्या ठेवण्याची कल्पना डोळ्यावरून सुचली असावी. पण माणसाचे डोळे लहान असतात. गाईचे लांबट असतात. म्हणून गाईच्या डोळ्यासारख्या खिडक्या माणूस करू लागला. संस्कृतात खिडकीला गवाक्ष म्हणतात. गवाक्ष म्हणजे गाईचा डोळा. अशी खिडकी काढून दाखवा बरे, असे मी मुलांना सांगेन. म्हणजे आली चित्रकला. यापुढे खिडक्यांच्या रचनेत माणसाने कसकसा फरक केला हे मी मुलांना सांगेन. म्हणजे झाला इतिहास. अशा खिडक्या सध्या कुठे आहेत, हे सांगताना त्यांना लॅपलँडकडे घेऊन जाईन. अशा रीतीने दूरच्या देशांच्या आणि दूरच्या लोकांच्या जीवनाची माहिती सहज प्रसंग आणून सांगितली पाहिजे. आपल्यासारखी दाट आणि प्राचीन वस्ती असलेला देश चीन. तेथील जमीन अनेक वर्षांपासून नांगरली गेली आहे. मग चीन इतका सुपीक कां? सुपीकपणा टिकविण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगताना खताची माहिती मी मुलांना देईन. सोनखताचा उपयोग कसा करावा हे चिनी लोकांपासून शिकण्यासारखे आहे. ते लोक सोनखताचा सढळपणे उपयोग करतात, त्यामुळे तेथील जमीन इतकी वर्षे नांगरली गेली असूनही सुपीक आहे हे मी समजावून सांगेन. एका अमेरिकन माणसाने ‘चार हजार वर्षांचे शेतकरी’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात म्हटले आहे ,की आपण अमेरिकन लोक उधळे आहोत. माणशी पंधरा-वीस एकरांइतकी जमीन आहे. नांगरून फक्त चारशे वर्षे झाली आहेत. तरी पण पीक वाढविण्यासाठी निरनिराळी रासायनिक खते जमिनीत टाकून जमीन बिघडवितो आणि सोनखतासारखे उत्कृष्ट खत वाया घालवितो.

मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवायची आहे पण ती शिकवण्यासाठी भोवतालच्या घटनांचा पुरेपुर उपयोग केला जात आहे.आज एकात्मिक अध्ययनाचा विचार केला जात आहे.1993 साली आलेल्या ओझ्याविना अध्ययन अहवालात मुलांच्या शिकण्यातील माहितीचे ओझे कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयातही एकात्मिक शिक्षणाची भूमिका प्रतिपादन केली आहे.महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली,दुसरीसाठी एकात्मिक पाठयपुस्तकाचे विकसन केले आहे.त्यामुळे विनोबांनी एकाच घटकात भूगोल इतिहास,परिसर अभ्यास,भाषा,गणित सारखे विषय कितीतरी सहजतेने गुफंले आहेत .ती मांडणी लक्षात घेतली तर विषय एकमेकातून सहजतेने गुफंले जाऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सहजतेने मदत होते.त्यादृष्टीने विनोबांनी वर्गातील अध्यापनाची दिशा स्पष्ट केली आहे.आज आपण ते ज्या वाटेने वर्गातील अध्यापनाची प्रक्रिया जावी म्हणून सांगत होते तोच मार्ग निवडला होता.कदाचित आज आपण त्याला अध्यापन शास्त्र,सिंध्दातात बांधले असेल मात्र तरी सुध्दा दिशा बदलत नाही हे लक्षात घ्यायला हवे.त्यामुळे गांधी, विनोबांची वाट आपल्याला शिक्षणात मूलभूत परिवर्तन करण्यास निश्चित मदत करेल हे लक्षात घ्यायला हवे.

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या